साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील खादगाव येथील माजी उपसरपंच तथा शेतकरी प्रमोद चौधरी (वय ४०) यांचा उष्माघातामुळे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी, २२ मे रोजी दुपारी १ ते १:३० वाजेच्या दरम्यान घडली आहे. ह्या घटनेमुळे प्रमोद चौधरी यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
खादगाव येथील माजी उपसरपंच प्रमोद चौधरी हे त्यांच्या शेतात काही कामानिमित्त गेले होते. दुपारी १ वाजेची वेळ असल्याने सूर्य आग ओकत होता. या तापमानात ते घरी परतल्यानंतर त्यांनी थंडगार पाणी पिले. एकदम थंड पाणी जास्त प्रमाणात पिल्यानंतर अचानक त्यांना चक्कर येऊन त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव झाल्याने त्यांना तात्काळ जामनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगुन त्यांना मृत घोषित केले. उष्मघातामुळे त्यांना हृदयाचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांचा मूत्यू झाल्याचे सांगण्यात आले.