संत सखाराम महाराजांच्या रथोत्सवात सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडले

0
31

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील संत सखाराम महाराज संस्थानतर्फे १९ रोजी वैशाख शुद्ध एकादशीला रात्री ८ वाजता रथ उत्सव अतिशय उत्साहात हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. हा रथोत्सव रात्रभर चालतो. दुसऱ्या दिवशी रथ हा मूळ जागी परत येतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही पहिली मोगरी लावण्याचा मान मुस्लिम बांधवांना मिळाल्याने पुन्हा सामाजिक एकात्मतेचे आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतीक रथ उत्सवातून दिसून आले. त्यामुळे सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडून संत सखाराम महाराजांचा गजर करत भक्तांनी दर्शन घेतले.

जयदेव, सखा हरी देव यांनी विधिवत रथाची पूजा केली. रथात लालजीची मूर्ती विराजमान केल्या. रथावर बसण्याचा मान ब्रह्मे व वैद्य पुजारी यांना मिळाला. भेर व तुतारीच्या निनादात संस्थानातील मंदिराजवळून रथाची सुरुवात झाली. रथाच्या पुढे भगवे ध्वजधारक, दोन घोडेस्वार होते. त्यांच्या पाठोपाठ वारकरी व नगारे होते. सोबतच अब्दागिरी धारक सेवेकरी व मशालदारी सेवेकरी होते. लेझीम मंडळाचे जल्लोषपूर्ण नृत्य, रथाच्या मागे लहान बैलगाड्यांवर महाराजांच्या चांदीच्या पादुका व मुखवटा ठेवला होता. त्यामागे गादीपती सद्गुरु संत प्रसाद महाराज अनवाणी पायी चालत जनतेला दर्शन देत होते. रथासोबत निशाणाचे घोडेस्वार भालदार, चोपदार, डंकासह मोठा लवाजमा होता. रथ ओढण्यासाठी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘सखाराम महाराज की जय’ हा नामघोष सतत सुरु होता. रथ उत्सव दरम्यान संपूर्ण मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दंगा नियंत्रण पथकाला पाचरण केले होते. रथापुढे विविध पथक कला सादर करत होती. रथ मार्गावर भाविकांना श्रीफळ, केळी, खडीसाखरचा प्रसाद देण्यात आला. रस्त्यावर ठिकठिकाणी प्रसाद तसेच महाराजांच्या रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. ठिकठिकाणी आरती करण्यात आली. रथ ओढण्यासाठी तरुणाईचा उत्साह प्रचंड दिसत होता. रथाच्या मागे असलेल्या मेण्यात आद्य महाराज यांच्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या. त्यामागे गादीपती संत सद्गुरु संत प्रसाद महाराज अनवाणी पायी चालत जनतेला दर्शन देत होते. रथापुढे विविध पथक कला सादर करीत होते.

यावेळी माजी आ. शिरीष चौधरी, माजी आ.स्मिता वाघ, माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील, खा.शि.मंडळाचे संचालक डॉ. अनिल शिंदे, हरी भिका वाणी, प्रभाकर कोठावदे, मुख्याधिकारी तुषार नेरकर, डीवायएसपी सुनील नंदवाडकर, पो. नि. विकास देवरे यांच्यासह राजकीय सामाजिक व प्रशासकीय सेवेतील अधिकारी, मान्यवर उपस्थित होते.

२३ मे रोजी पालखी सोहळा

रथोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी रात्रभर प्रचंड गर्दी केली होती. रात्री ११ वाजता सराफ बाजारात रथ दाखल झाला. दीड वाजेनंतर रथ दरवाजा बाहेर पडून फरशी पुलाकडे वळला. पुलावर पाहेचल्यावर तेथे फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करण्यात आली. त्यानंतर रथ बोरी नदीवरून, पैलाड येथून किल्ल्याच्या बाजूने नवीन पुलावरून सकाळी पुन्हा आठ वाजता रथवाडीत पोहोचला. तेथे आरती होऊन उत्सवाची सांगता करण्यात आली. प्रसाद महाराज यांनी सर्वांचे आभार मानले. रथाच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत यात्रा सुरू होती. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ विविध प्रकारची खेळण्याची दुकाने थाटली आहेत. पुढील पंधरा दिवस यात्रा उत्सव सुरू राहणार आहे. येत्या गुरुवारी, २३ मे रोजी वैशाखी शुद्ध पौर्णिमेला पालखी सोहळा पार पडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here