जळगाव : परेश बऱ्हाटे
सध्या लोकसभेची धामधुम सुरू असून राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतदान आटोपले असून आता सर्वांना निकालाची उत्सुकता असतांनाच भाजपाचे संकटमोचक तथा ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांचा वाढदिवस उद्या १७ मे रोजी आहे. खरं तर, आचारसंहिता असल्यामुळे या वाढदिवसाच्या सेलीब्रेशनवर बऱ्याच प्रमाणात मर्यादा येणार असल्या तरी हजारो कार्यकर्ते आणि लाखो चाहत्यांच्या ह्रदयसिंहासनावर विराजमान झालेल्या जननायकाचा हा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.
राजकारणात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे घटक हे अर्थातच पैसा आणि जातीचे पाठबळ हे होय. याच्या बळावरच कुणालाही यशस्वी राजकारणी होता येते मात्र या दोन्हींपैकी कोणत्याही प्रकारचे भक्कम पाठबळ नसतांना गिरीश दत्तात्रय महाजन या सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर राज्यातील राजकारणात जी उंची गाठली ती कुणालाही थक्क करणारी अशीच म्हणावी लागेल. एका गावचा सरपंच, आमदार, विरोधी पक्षातील महत्वाचा नेता, कॅबिनेट मंत्री आणि आपल्या पक्षासाठीचे डॅमेज कंट्रोलर (संकटमोचक) अशा पायऱ्या चढून आज ते महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जात आहेत.
गिरीशभाऊंची आजवरची वाटचाल ही विकासाभिमुख राहिलेली आहे.त्यांच्या कार्यकाळात जामनेर शहरासह मतदारसंघ हा किती बदलला हे पाहून कुणीही थक्क झाल्याशिवाय राहत नाही. विशेष करून जामनेर शहराने तर अक्षरश: कात टाकली आहे. ग्रामीण भागात झालेल्या पायाभूत सुविधा आणि सिंचनाच्या क्रांतीमुळे आर्थिक क्रांती झाली आहे. जिल्ह्याचा विचार केला असता त्यांनी मेडिकल कॉलेज आणण्याची कामगिरी तर केलीच पण देशातील पहिले भव्य-दिव्य शासकीय मेडिकल हब उभारण्याची अशक्यप्राय कामगिरी देखील पार पाडली. शेळगाव धरण व वरखेडे-लोंढे बॅरेजच्या पूर्णत्वापासून ते पाडळसरे धरणाला मिळालेल्या गतीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा नाकारून चालणार नाही.
आपल्या या आजवरच्या कार्यकाळात गिरीशभाऊ यांच्यातील एक गुण म्हणजे ते आपल्या पक्षाचे निष्ठावान व कट्टर समर्थक आहेत.त्यांच्या कारकिर्दीतील तब्बल १५ वर्षे इतका मोठा कालखंड विरोधात राहून देखील ते कधी डगमगले नाहीत.अनेक संकटांवर मात करून ते स्वत: पुढे मार्गक्रमण करीत राहिले आणि आपल्या पक्षासाठी संकटमोचक बनले. इतके सारे होत असतांना भाऊंचे पाय सातत्याने जमीनीवर राहिले आहे.
जामनेरचे सरपंच असतांनाची त्यांची जनहिताची तळमळ ही आज मोठे नेते बनल्यानंतर देखील तितकीच कायम आहे. एकीकडे विकासकामांचा डोंगर उभा करतांनाच लोकांच्या सुख-दु:खात सहभागी होण्याचे काम ते सातत्याने करत असतात. मरण-कारण-तोरण या बाबी ते कधी चुकवत नाहीत.
गोरगरिबांना आधारस्तंभ
ठरलेली आरोग्य सेवा
सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्यांची आरोग्यसेवा होय. अगदी साध्या विकारांपासून ते असाध्य रोगांवरील उपचारांसाठी त्यांनी उभी केलेली प्रणाली ही कुणालाही अक्षरश: चकीत करणारी आहे.गिरीशभाऊंच्या वैद्यकीय सेवेचा हा पॅटर्न आज राज्यातील अनेक नेत्यांनी अगदी जसाचा तसा उचलून आपल्या जिल्ह्यात राबवत असल्याची बाब येथे त्यांची महत्ता विषद करणारी ठरली आहे.
आज ना. गिरीशभाऊ महाजन हे राज्यातील भाजपाचे बडे नेते तर आहेच पण ते आपल्या दिलदारपणामुळे लक्षावधी जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.ग्रामविकास व पर्यटनासारख्या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.सोबतीला तीन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद सांभाळून पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या पार पडतांना खर तर कुणीही प्रचंड तणावात आला असते मात्र कामाच्या इतक्या मोठ्या व्यापात देखील गिरीशभाऊ हे पूर्वीसारखेच मिश्कील, खेळकर असल्याचा अनुभव त्यांच्या चाहत्यांना येत आहे.इतक्या उंच पदावर जाऊनदेखील जनसेवेचा अविरत ध्यास घेतलेल्या या जननायकाला दीर्घायू लाभो, त्यांच्या हातून जनतेची सेवा सातत्याने घडो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते आयुष्यात अजून नवीन शिखरांंना स्पर्श करोत हीच सदिच्छा!
परेश बऱ्हाटे
व्यावस्थापकिया संचालक साईमत मिडिया प्रा.ली