साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी, १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रावेर लोकसभा मतदार संघातील मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघनिहाय मतदान साहित्य, ईव्हीएम मशीनचे वाटप रविवारी, १२ रोजी मुक्ताईनगर शहरातील संत मुक्ताबाई महाविद्यालय येथे करण्यात आले. दुपारनंतर मतदान कर्मचारी ईव्हीएम मशीन व साहित्यासह मतदान केंद्रावर रवाना झाले. १३ मे रोजी सकाळी ७ वाजेपासून मतदार संघात मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
रावेर लोकसभा मतदार संघात १ हजार ९०४ मतदान केंद्र आहेत. यामध्ये मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात ३२२ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी एक, दोन, तीन व शिपाई व पोलीस कर्मचारी असे १ हजार ९३२ कर्मचारी मतदान ड्युटीकरीता नियुक्त केले आहेत. मतदार संघात दहा आदर्श मतदार केंद्र आहेत. तसेच एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचारी व मतदान साहित्याची वाहतूक करण्यासाठी ४१ बसेस, ४८ क्रुझर वाहनांची सोय केली आहे. यासह ३१ सेक्टर अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था केली आहे. ८८ रिझर्व्ह कर्मचारी तसेच २६ मायक्रो ऑब्झर्वर आहेत.
रावेर लोकसभा मतदार संघात १८ लाख २१ हजार ७५० मतदारांची नोंद केली आहे. त्यामध्ये मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये १ लाख ५१ हजार ६२८ पुरुष मतदार तर १ लाख ४२ हजार ६८३ महिला मतदार तर ७ तृतीयपंथी मतदार नोंदविण्यात आले आहेत. मतदारसंघातील १६१ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग कॅमेरा व ४६ मतदान केंद्रांवर मतदान केंद्राबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. जे मतदान केंद्र पत्राचे शेडमध्ये असतील त्या ठिकाणी कुलरची व्यवस्था केली आहे.
मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्यात १ पोलीस उप अधीक्षक, १ पोलीस निरीक्षक, ११ पोलीस अधिकारी, ४५० पोलीस कर्मचारी, १५० होमगार्ड, सीआयएसएफचे ३० कर्मचारी असा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. डीवायएसपी, आर.एम.शिंदे, पोलीस निरीक्षक नागेश मोहिते बंदोबस्तावर लक्ष ठेवून आहेत.
मतदान केंद्रावर मोबाईल बंदी
मतदार संघात मतदान केंद्रावर मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, कार्डलेस फोन, वायरलेस सेटसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वापरास, बाळगण्यास निर्बंध आहेत. मतदान केंद्राध्यक्ष यांच्याजवळ भ्रमणध्वनी असेल परंतु तो सायलेंट मोडवर असेल. मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल वापरता येणार नाही. मतदान केंद्रावर परिपूर्ण सोयी केल्या आहेत. त्यात पिण्याचे पाणी, उन्हापासून बचाव करण्यासाठी मंडप किंवा शेड, मतदार सहाय्य्यता केंद्र, आरोग्याशी संबंधित अडचणीसाठी आरोग्य केंद्र, अंगणवाडी व बालसंगोपन केंद्र यासह सर्व प्रकारच्या पूरक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
नागरिकांनी निर्भयपणे मतदानाला यावे
नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदानासाठी घराबाहेर पडावे. प्रशासनातर्फे मतदान केंद्रावर सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. मतदारांनी लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होऊन आपला हक्क बजवावा, मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार गिरीश वखारे यांनी केले आहे.