मनोज जरांगे यांच्याबद्दल खोडसाळ पोस्ट ‘व्हायरल’

0
29

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

जळगावातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या नावाने मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी खोटी पोस्ट सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाली. एबीपी चॅनलचा लोगो व नाव वापरलेली ही पोस्ट तयार करताना स्मितातार्इंचे फोटो व नाव वापरत खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब निदर्शसनास येताच स्मिताताई वाघ व ना. गिरीश महाजन यांनीही संताप व्यक्त केल्यानंतर आरोपींविरुध्द भाजपाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात प्रचार शिगेला आला असतांना अशातच प्रचार थांबण्याच्या काही तास आधी ‘खासदार झाल्यास मनोज जरांगे पाटील यांच्या अटकेची मागणी करणार’ अशा पोस्टवर एबीपी चॅनलचा लोगो व स्मिता वाघ यांचा फोटो वापरला आहे. अशा खोडसाळपणामुळे जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.

स्मिता वाघ म्हणाल्या की, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण पाळणारे आहोत. शिवछत्रपतींच्या काळात महिलांना सन्मान होता. आता काही विरोधक महिलांच्या नावाने असे प्रकार करुन महिलांचा अपमान करत आहेत. समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. मनोज जरांगे यांनाही ही बातमी कळाल्यास तेदेखील अशा वृत्तीचा विरोधच करतील. माझ्या विरोधात षडयंत्र रचून बदनामीचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

ना. गिरीश महाजन म्हणाले, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना पराभव दिसू लागला आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करुन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. मराठा समाज आमच्यासोबत आहे हे विरोधकांना पाहिले जात नाही, यामुळेच त्यांनी हे खालच्या दर्जाचे राजकारण केले असल्याचा आरोप ना. महाजन यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here