साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर
शहरात पूर्वी झालेल्या चोऱ्यांमध्ये सावदा-फैजपूर रस्त्यावरील न्यू पंजाब हॉटेलमधून सुमारे ६३ हजार, जाकीर कुरैशी यांच्या घरातून ७ लाख, शरद भारंबे, देवीदास तायडे, भागवत कासार, अक्रम खान, बासीद खाटीक यांच्या घरी झालेल्या चोऱ्या, सोनाली कोल्ड्रिंकसह परिसरातील शेतकरी बांधवांच्या शेतातून शेतीपयोगी मौल्यवान साहित्य चोरीस गेल्या बाबतच्या नोंदी सावदा पोलीस ठाण्यात आहेत. अशा चोऱ्यांचा छडा लावण्यात पोलिसांना अद्यापही यश मिळालेले नाही. त्यामुळे त्यांचा तपास शून्य आहे. दुसरीकडे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.
सावदा येथील सोमेश्वर नगरमध्ये सात दिवसांपूर्वी धनराज रंगु पाटील यांच्या घरी ७० हजारांच्या ऐवज चोरट्यांनी लंपास केले. त्याच ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे निवासस्थान आहे. घरफोडी झाल्याची घटना ताजी असताना शहरातील गांधी चौक शेखपुरा येथून ५ मे रोजी रात्री १२ वाजेच्या नंतर खाकीचा कोणताच धाक न बाळगता एकदम थंड डोक्याने अज्ञात चोरट्यांनी घरासमोर उभी असलेली सुझुकी कंपनीची एमएच १९ डीवाय २१२१ या क्रमांकाची दुचाकी लंपास करून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. दुचाकी चोरटा कशा निडरपणे पध्दतीने चोरुन नेत असल्याबाबतचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. आठ दिवसात दोन चोरीच्या घटनांमुळे नागरिक कमालीचे धस्तावले आहे. त्या अनुषंगाने थेट पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.