साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळे येथील सु.अ. पाटील माध्यमिक विद्यालयाच्या आवारात लावण्यात आलेल्या ८० ते ९० झाडांना उन्हाच्या झळा बसून पाण्याअभावी ते वाळून नष्ट झाले असते. मात्र, गावातील सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी स्वतःच्या विहिरीवरून टँकरद्वारे झाडांना पाणी देत ‘जीवदान’ दिले आहे. याबाबत गावात त्यांचे कौतुक होत आहे.
अमळनेर तालुक्यातील पिंपळे गावाला यावर्षी पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यामुळे गावात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी शासनाने पाठविलेल्या टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. अशा परिस्थितीत गावात असलेल्या कै. सुकलाल आनंदा पाटील विद्यालयात ‘आमची शाळा आमचा अभियान’ उपक्रमांतर्गत मुख्याध्यापक अशोक देसले यांनी शाळेच्या आवारात ८० ते ९० वृक्षांची लागवड केली होती. मात्र, मार्च महिन्यापासून गावाला मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जगविण्यात आलेली झाडे पाण्याअभावी नष्ट होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, गावातील लोकनियुक्त सरपंच वर्षा पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी स्वतःच्या विहिरीवरून आठवड्यातून एक दिवस पाण्याचे टँकर भरून शाळेत असणारी टाकी भरून देवून त्याद्वारे आठवड्यातून दोन दिवस झाडांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यासाठी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.