मळगावला ८ ते ९ दिवसाआड होतोय पाणीपुरवठा

0
33

साईमत, भडगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील मळगावला सध्या ८ ते ९ दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. दुसरीकडे पाझर तलाव कोरडा झाला आहे. पाणी पुरवठा करणारी विहीरही पाण्याचा तळ गाठत कोरडीठाक झाली आहे. गेल्या पंधरवड्यापासून पाणीटंचाईच्या झळा गडद होत आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांना पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी सामनाच करावा लागत आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यापुढे गावाला पाणी पुरवठा कसा होणार? असा गंभीर प्रश्‍न ग्रामपंचायत प्रशासनासमोर उभा आहे.

मळगावला पाणीटंचाई निर्माण झाल्याने पिण्याचे टँकर तात्काळ सुरु करावे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावावा, या मागणीचा प्रस्ताव मळगाव ग्रामपंचायतीमार्फत भडगाव पंचायत समितीच्या प्रशासनाला नुकताच देण्यात आला आहे. प्रशासनामार्फत मळगावासाठी तात्काळ पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करावे, पिण्याच्या पाण्याचा मुख्य प्रश्‍न मार्गी लावावा, याबाबत तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी सरपंच शोभाबाई रामकृष्ण पाटील, उपसरपंच उषाबाई प्रताप परदेशी यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, महिला वर्गातून होत आहे. तसेच मळगावासाठी नवीन जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजुर आहे. तब्बल दोन वर्ष उलटुनही काम सुरु न होता ही योजना कागदावरच फिरत आहे. अद्यापही पाणीपुरवठा योजनेचे भिजत घोंगडे पडलेले आहे. गिरणा नदी काठावर पाणी पुरवठा विहिरीसाठी मंजुरीचे पत्रही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहे. मात्र, याकडे प्रशासनाचेच सोयीस्कर दुर्लक्ष झाले आहे. आता तरी नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु होईल का? असा संतप्त प्रश्‍न ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे.

तालुक्यातील मळगाव हे तालुक्याच्या सीमेवरचे छोटेसे गाव आहे. पण शासनाच्या योजना लाभापासून कोसो दुर राहिले आहे. हे गाव अवर्षण प्रवर्षण क्षेत्रात येते. डोंगराळ भाग व बरड भाग असलेली कोरडवाहु जमीन आहे. शेती सिंचनासह जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न असे सर्व दरवर्षी निसर्गावरच अवलंबुन असते. मळगाव परिसरात तीन पाझर तलाव आहेत. मात्र, यावर्षीही पावसाळा कमी प्रमाणात झाल्याने हे पाझर तलाव पाण्याने पूर्णपणे भरले नाहीत. मळगावासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा दीड कि.मी. अंतरावरील तांदुळवाडी पाझर तलावातून केला जातो. तांदुळवाडी पाझर तलावाजवळच मळगावला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. यावर्षी पावसाळा कमी प्रमाणात झाल्याने पाझर तलावात जेमतेम पाणीसाठा शिल्लक राहिला. तांदुळवाडी पाझर तलाव कोरडा बनला आहे. पाणी पुरवठा करणारी विहीरही पाण्याने तळ गाठत कोरडीठाक बनल्याचे चित्र आहे. सध्या मळगावासाठी तब्बल ८ ते ९ दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कसातरी केला जात आहे. नळांना १० ते १५ मिनिटे जवळपास पाणी मिळत आहे. त्यामुळे सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई व उग्र रुप धारण होतांना दिसत आहे. नळांना पाणी आल्यावर नागरिकांसह महिलांची मोठी धावपळ होतांना दिसते. जनावरांचे पिण्याच्या पाण्याचे मोठे हाल होतांना दिसत आहे.

मळगावसाठी मागणीनुसार शासनाने नवीन जलजीवन पाणी पुरवठा योजना मंजुर केलेली आहे. याकामी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील, पाचोरा-भडगावचे आ.किशोर पाटील यांचे प्रयत्न व निधीतून नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम मंजुर झालेले आहे. पाणी पुरवठा विहिरीसाठी गिरणा नदीच्या काठावर जागा मंजुरीचे पत्रही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहे. योजनेच्या कामासाठी १ कोटी २६ लाख रुपयांचा निधीही मंजुर झालेला आहे. मात्र, तब्बल दोन वर्ष उलटुनही योजनेचे काम सुरु झालेले नाही. ही योजना फक्त कागदावरच फिरत आहे. मात्र, याकडे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होतांना दिसत आहे. ही योजना दोन वर्षापासून मंजुर आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ शासन दरबारी, लोकप्रतिनिधींकडे वारंवार चकरा मारुनही योजनेचे काम का सुरु झाले नाही? आज पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले असते तर मळगाववर पाणीटंचाईची वेळ आली नसती, असे संतप्त ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करुन न्याय द्यावा, अशी मळगाव येथील ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच मंजुर जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु करण्यात यावे, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

मळगावला पाण्याचे टँकर सुरु करण्याबाबत पंचायत समितीला ग्रामपंचायतीमार्फत प्रस्ताव दिलेला आहे. तात्काळ पाण्याचे टँकर सुरु करावे. तसेच दोन वर्षापासून गिरणा नदीपासून मळगावासाठी मंजुर झालेली जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरुच झालेले नाही. नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामास सुरुवात करण्याची मागणी केली असल्याचे सरपंच शोभाबाई पाटील यांनी सांगितले.

सध्या मळगावला ८ ते ९ दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. शासनामार्फत मळगावासाठी तात्काळ पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करण्यात यावे. पिण्याच्या पाण्याचा मुख्य प्रश्‍न सोडवावा, अशी मागणी उपसरपंच उषाबाई परदेशी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here