साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर
येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावदा-पाल महामार्गावर चिनावल येथील दुचाकी स्वार आणि होंडा कंपनीच्या कारचा अपघात होऊन दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले आहेत. ही घटना मंगळवारी, ३० एप्रिल रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास कोचूरजवळ घडली. घटनेची माहिती मिळताच अपघातस्थळी पोलीस दाखल झाले होते. यावेळी अपघातस्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.
अपघातात चिनावल येथील वीरेंद्र सुनील नेमाडे (वय २७) आणि अनिल चुडामण मेढे (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला. हिरो होंडा कंपनीची बाईक फॅशन प्लस (क्र.एम.एच १९ एबी ११०१) आणि होंडा कंपनीची ग्रे रंगाची बी.आर.व्ही. (क्र.एमएच १९ डीएम ०३५१) या गाडीचा जबरदस्त अपघात झाला. अपघातात कार चालक एअर बॅगमुळे बचावले असून ते किरकोळ जखमी झाले आहे. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी दवाखान्यात रवाना केले होते. यावेळी मयताच्या नातेवाईकांनी एकच टाहो फोडला. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती. त्यासाठी महेंद्र हेमंत नेमाडे हे फिर्याद देण्यासाठी थांबून होते.
            


