मतदारांना घरबसल्या मिळणार ‘वोटर स्लिप’

0
59

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

येत्या १३ मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. गुरुवारी, दोन मे पर्यंत चोपडा विधानसभा मतदारसंघातील तीन लाख २२ हजार २२८ मतदारांना घरबसल्या त्यांची मतदार चिठ्ठी मिळावी म्हणून ३१९ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी काम सुरू केले आहे. चोपडा तहसील कार्यालयात पार पडलेल्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी त्यांना मुदतीत मतदार चिठ्ठी वाटप पूर्ण करण्याचे सुचित केले. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, मास्टर ट्रेनर नरेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.

यावेळी केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्‍यक त्या सर्व साहित्याचे वाटप साहित्य नोडल अधिकारी रवींद्र माळी यांनी केले. तसेच सर्व केंद्रस्तरीय अधिकारी यांना शासनाच्यावतीने निर्गमित केलेल्या ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. घरोघरी मतदार चिठ्ठीचे वाटप करताना घरातील सज्ञान व्यक्तीच्या हाती मतदार चिठ्ठी देण्यात यावी. तसेच कोणत्याही स्वरूपाची तक्रार येणार नाही, याची दक्षता घ्यावी. मतदार चिठ्ठी दिल्याबाबत नोंद वहीवर सही घ्यावी. तसेच शिल्लक मतदार चिठ्ठी २ मे नंतर अनुपस्थित, स्थलांतरित व मयत मतदारांच्या याद्यांसह तहसील कार्यालयात जमा करण्यात यावे. यापूर्वी मतदार चिठ्ठीवर मतदाराचे फोटो होते. मात्र यावेळेस त्या ठिकाणी बारकोड देण्यात आलेले आहे. हा बारकोड स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी मतदाराचा संपूर्ण तपशील दिसणार आहे. तसेच मतदारसंघाच्या पाठीमागील बाजूवर मतदान केंद्राचा मार्ग दर्शविण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here