साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील मंगळग्रह मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंगळवारी, २३ एप्रिल रोजी पहाटे ४ ते सकाळी ६.२० या वेळेत मंगळेश्वर पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीवर मुख्य यजमान जळगावचे माजी उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे, बांधकाम व्यावसायिक इंजि.राहुल सोनवणे, ॲड. अमित सोनवणे, सूर्या सोनवणे यांच्या हस्ते विशेष पंचामृत महापूजा करण्यात आली.
प्रारंभी सर्व मुख्य यजमानांनी गणेशपूजन केले. त्यानंतर मंगळेश्वर पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीवर पंचामृत करण्यात आला. त्यानंतर विधीवत हनुमान जन्मोत्सव सोहळा झाला. यावेळी रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालिसा पठण तसेच भाविकांकडून पुष्पवृष्टी होऊन पाळणा हलवत भक्तिमय व मंगलमय वातावरणात ‘श्रीराम जय राम जय जय राम’, ‘संकटमोचन हनुमान की जय’, असा जयघोष करण्यात आला. त्यानंतर महाआरती होऊन रात्री उशिरापर्यंत भाविकांना विशेष तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले.
मंगळग्रह मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी यांनी पौरोहित्य केले. त्यांना जयेंद्र वैद्य, अतुल दीक्षित, मंदार कुलकर्णी, गणेश जोशी, शुभम वैष्णव, अक्षय जोशी यांनी सहकार्य केले.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस.एन.पाटील, सहसचिव दिलीप बहीरम, विश्वस्त अनिल अहिरराव, प्रकाश मेखा यांच्यासह सेवेकरी आशिष चौधरी, भाविक उपस्थित होते.