वादळामुळे आठवड्यापासून वीजपुरवठा खंडित ; पिंपळेत पाणीटंचाई

0
22

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील चिमणपुरी आणि पिंपळे खु. ही दोन्ही गावे मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे. येथील लोकसंख्या सुमारे २१०० आहे. गावात शेतकऱ्यांच्या जनावरांची संख्याही भरपूर आहे. अमळनेर तालुक्यात १२ रोजी झालेल्या वादळी अवकाळी पावसामुळे येथील विजेचे खांब उन्मळून आडवे झाले. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. वीज नसल्याने ग्रामस्थांना पाणी मिळणे कठीण झाले होते. अशावेळी गावाच्या महिला सरपंच वर्षा पाटील व त्यांचे पती युवराज पाटील यांनी आपल्या शेतातील विहिरीचे पाणी त्यांनी गावालगत आपल्या शेतात पाइपलाइनने पोहचविले. त्या विहिरीतील पाणी मोटारीने टँकरने भरून गाव विहिरीत टाकले जाते.

दिवसाला चार टँकर भरले जातात. तीन ते चार दिवसात सकाळी-सायंकाळी गावात टप्याटप्याने पाणी सोडले जाते. जनावरांसाठी गावाबाहेर हौद केला आहे. तो सतत भरून ठेवला जातो. त्यामुळे कडक उन्हातही माणसांची तहान भागवली तशी जनावरांचीही तहान भागविली जात आहे. सरपंच वर्षा युवराज पाटील यांनी वीजपुरवठ्याअभावी गावात पाणीपुरवठा होत नसल्याने निर्माण झालेली टंचाई दूर करण्यासाठी आपल्या शेतातील पाणी टँकरने आणून गावाच्या विहिरीत टाकले. त्यामुळे तेथून ग्रामस्थांना सहज पाणी उपलब्ध होत आहे. टंचाईच्या काळात त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आवश्‍यक दुरुस्ती करून तातडीने वीजपुरवठा सुरू करण्यासाठीही सरपंच वर्षा पाटील यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here