वरणगावला घराला आग, मोठा अनर्थ टळला

0
29

साईमत, वरणगाव : प्रतिनिधी

शहरातील पुरातन श्रीराम मंदिराचे पुजारी यांच्या घरात गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला. त्यामुळे घरात आग लागल्याने धावपळ सुरू झाली. मात्र, रामनवमीनिमित्त उपस्थित युवा भाविकांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली. आगीत किरकोळ साहित्याचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे नगरपरिषदेचा अग्निशामक बंब उशिराने आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे अग्निशमन बंब केवळ नावालाच असल्याचा सूर जनतेतून उमटला.

सविस्तर असे की, वरणगाव शहरातील पुरातन श्रीराम मंदिर येथे रामनवमीनिमित्त ९ एप्रिलपासून संगीतमय महाशिवपुराण कथा सुरू आहे. १७ एप्रील रोजी दुपारी १२ वाजता राम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी पुजारी बालकदास बैरागी यांच्या घरात प्रसाद तयार करण्याची तयारी सुरू होती. मात्र, यावेळी स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतल्याने घरातील महिलांची धावपळ सुरू झाली. त्याची दक्षता घेवून राहुल माळी, निखील बैरागी, सुरजदास वैष्णव, ललीत पटेल, अक्षय बैरागी, ओम पटेल, प्रणय वैष्णव, पत्रकार विजय वाघ यांच्यासह इतर युवा भाविकांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. यामुळे पुढील होणारा मोठा अनर्थ टळण्यास मदत झाली.

अग्निशामक बंब उशिराने दाखल

आग लागल्याचे निदर्शनास येताच उपस्थितांनी नगर परिषदेच्या अग्निशामक दल विभागाशी संपर्क साधला. मात्र, नगरपरिषदेचा अग्निशामक बंब आग आटोक्यात आल्यानंतर घटनास्थळी दाखल झाल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त करत नगर परिषदेच्या अग्निशामक दलाचा कारभार ‘साप गेल्यावर काठी मारण्यासारखा’ झाल्याचे दिसून आले. यावेळी नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक पंकज सूर्यवंशी यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती जाणून घेतली. तसेच मागील काही दिवसांपूर्वी दीपनगर येथे कोळसा वाहुन नेणाऱ्या मालगाडीच्या डब्यातील कोळश्‍याला आग लागली होती. मात्र, यावेळीही नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी अपयश आले होते. त्यामुळे आयुध निर्माणीच्या अग्निशामक बंबास पाचारण करावे लागले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here