साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील मेहुणबारे फाट्याजवळ गुरुवारी, ११ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता बेकायदेशीररित्या गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक मेहुणबारे पोलिसांनी पकडला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत १८ लाख ३९ हजार ८४० रुपये किमतीचा गुटखा आणि ट्रक जप्त केला आहे. याप्रकरणी शुक्रवारी, १२ एप्रिल रोजी पहाटे मेहुणबारे पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे फाटा रस्त्यावरून ट्रकमधून बेकायदेशीररित्या गुटखा व सुगंधित पान मसालाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मेहुणबारे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मेहुणबारे पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुरुवारी, ११ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता पथकाने मेहुणबारे फाट्याजवळ कारवाई केली. कारवाईत ट्रक (क्र.एमएच २० जीसी ५५७३) पकडला. त्यानंतर ट्रकमध्ये पाहणी केल्यावर त्यात गुटखा व सुगंधित पान मसाला आढळून आला. पोलिसांनी ट्रकसह मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक प्रमोद मंडलिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोपी अशोक मंडोरे (रा.अहमदनगर), विवेक बन्सीधर कुलकर्णी (रा. छत्रपती संभाजीनगर), शंकर गरुड (रा. छत्रपती संभाजीनगर), संजय माता (रा.मध्यप्रदेश) आणि दीपक वालीच्या (रा. मध्यप्रदेश) अशा पाच जणांविरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोडे करीत आहे.