साईमत, रावेर : प्रतिनिधी
शहरात बेशिस्त वाहतूक तसेच कुठेही होत असलेली पार्किंग नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातील रस्त्यावरुन ये-जा करतांना महिला व नागरिकांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशा जटील समस्याकडे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
रावेर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, मेन रोड, छोरीया मार्केट गेट नजिक, बुरहानपूर जिलेबी सेंटर जवळ महालक्ष्मी मंदिर नजिक रिक्षा चालक स्वत:ची रिक्षा रस्त्यावर लावत आहे. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. तसेच सामान खरेदी करण्यासाठी आलेले लोक त्यांची खासगी वाहने रस्त्यावर लाऊन सामान खरेदीसाठी निघुन जात असल्याने दैनंदिन वाहतुकीस रोज अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक दुकानात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचे वाहने रस्त्यात त्यांच्या दुकानासमोर उभे करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहे.
रावेर शहर आधीच संवेदनशील असल्याने वाहतुकीची समस्या किंवा कोणाचा लागलेला धक्का येथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा समस्येकडे लक्ष देण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून जोर धरत आहे.