साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
लोकसभेसाठी मतोत्सवाची घोषणा नुकतीच देशभरात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. चाळीसगाव मतदारसंघातही निवडणूक पूर्वतयारीच्या कामांना वेग आला आहे. मतदान कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, आचारसंहिता कक्षाची स्थापना, मतदान केंद्रांची व्यवस्था त्याचबरोबर मतदार संघातील मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रोत्साहनपर प्रयत्न होत आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकतीच चाळीसगाव मतदारसंघांमध्ये भेट घेऊन निवडणूक पूर्वतयारी कामाचा आढावा घेतला. निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार तथा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी प्रशांत पाटील, गटशिक्षण अधिकारी तथा नोडल अधिकारी विलास भोई, अप्पर तहसीलदार जगदीश भरकर, निवडणूक नायब तहसीलदार संदेश निकुंभ यांनी मतदारांना आवाहन करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून भावनिक साद घातली. शाळेतील चिमुरड्यांनी आपल्या घरातील आई-वडील, आजी-बाबा, सज्ञान ताई, दादा यांना पत्र लिहून मतदान करण्याचे आवाहन करण्याचे निश्चित झाले.
चाळीसगाव मतदारसंघातील लोकशाहीच्या महासंग्रामात ३४१ मतदान केंद्रावर १३ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. यामध्ये तीन लाख ५८ हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत ५८.२० टक्के मतदान झाले होते. मतदानाचा हा टक्का वाढविण्यासाठी लहान बालकांनी आपल्या घरातील मतदारांना जागृत करण्यासाठी हा विशेष प्रयत्न केला आहे. चाळीसगाव तालुक्यातील ३४२ शाळा ५५ हजार विद्यार्थी सामूहिक पत्र लिहिण्याची मोहीम २ एप्रिल २०२४ रोजी फत्ते केली. विशेष म्हणजे प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी केलेल्या केवळ एका व्हॉट्सॲप मेसेजला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तालुक्यातील सुमारे अकराशे शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतल्याने एकाच दिवशी ५५ हजार पत्रे पालकांपर्यंत पोहोचली. या पत्राची पोहच शाळेमध्ये संकलित करण्यात येणार आहे. या पत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी पालकांना आपला देश हा प्रगल्भ लोकशाहीची ख्याती असलेला खंडप्राय देश आहे. आपल्या देशाचे सरकार निवडण्याचा अधिकार हा मतदारांचा आहे.
लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान केलेच पाहिजे. आई-बाबा आपणांसह सर्वांनी मतदान केले. तरच आमचे भविष्य उज्ज्वल राहील, अशी भावनिक साथ घातली आहे. मुलांच्या भावनिक आवाहनामुळे निश्चितपणे मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल, असा विश्वास सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रमोद हिले यांनी व्यक्त केला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चाळीसगाव तालुक्यामध्ये दौऱ्याच्या दरम्यान मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे पालकांना पत्र ही प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. सर्व शिक्षकांनी यात मोलाची मदत केली असल्याचे प्र.गटशिक्षण अधिकारी विलास भोई यांनी सांगितले.