साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर
अनेक दिवसांपासून सुरु असलेली जनावरांची वाहतूक करणारे ट्रक चोरट्या मार्गाने सर्रासपणे सावदा शहरातून थेट रेल्वे स्टेशन रस्त्याने पुढे मार्गस्थ होतात. मात्र, सध्या डीवायएसपी अन्नापुर्णा सिंग फैजपूर यांनी सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या सहा वाहनांना पकडल्याची पहिली मोठी घटना असल्याचे चर्चिले जात आहे. हा अवैध व्यवसाय थेट शांततेसाठी धोकादायक आहे. त्यामुळे याकडे सावदा पोलिसांनी लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कारवाईत १०५ म्हशींसह ६९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, सर्व म्हशी रावेर येथील गोशाळेत रवाना केल्या आहेत.
सविस्तर असे की, सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रावेर ते पाल रस्त्यावर खिरोदा फॉरेस्ट नाक्याच्या खाली रस्त्यावर गुरुवारी, २८ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या सहा आयशर ट्रक पकडण्यात आले. त्यात निर्दयीपणे दाटीवाटीने भरलेल्या १०५ काळ्या रंगाचे लहान-मोठ्या म्हशी आढळून आल्या. जप्त मुद्देमालाची किंमत ६९ लाख ६७ हजार ६०० रुपये इतकी आहे.
यासंदर्भात पो.ना. निलेश जगतराव बाविस्कर यांनी सावदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने बेकायदेशीर जनावरांची वाहतूक करणाऱ्या जहिरखान वाहेदखान (वय ४६, रा.गंगापुरा, आष्टा, जि.सिहोर, मध्यप्रदेश), राशिद रईस कुरेशी (वय २२, रा.गंगापुरा आष्टा, जि.सिहोर, मध्यप्रदेश), अकबर सिकंदर खान (वय ४२, रा.सियापुरा, जि. देवास, मध्यप्रदेश), वसिम रजाक कुरेशी (वय ३५, रा.गंगापुरा, आष्टा, जि.सिहोर, मध्यप्रदेश), सलमान अहेमद नूर (वय ३४, रा.पठाणवाडी, सारंगपूर, जि.राजगड, मध्यप्रदेश, अफसर अबरार कुरेशी (वय ३८, रा.नजरवाडीसमोर, आष्टा, जि.सिहोर, मध्य प्रदेश), आझाद बाबु शेख (वय ४५, रा. ईटावा, जि.देवास, मध्य प्रदेश), फारुख लतीब कुरेशी (वय २८, रा.नेतवाडा, ता.जावर, जि.सिहोर, मध्यप्रदेश), साईद शहजाद खान (वय ३६, रा. गजरागेट चौराहा, देवास, मध्यप्रदेश, परवेज सादीक वेग (वय २२, रा.गोया, ता.नागदा, जि.देवास, मध्यप्रदेश), अमजदखान रईस खान (वय २६, रा.अल्लीपूर, आष्टा, जि.सिहोर, मध्यप्रदेश), नजिम नईम कुरेशी (वय २९, काझीपुरा, आष्टा, जि.सिहोर, मध्य प्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.