साईमत, बोदवड : प्रतिनिधी
प्रत्येक नागरिकांनी ग्राहक म्हणून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. तसेच सेवा देण्याची वृत्ती नोकरात असली पाहिजे, असे मत तालुका कृषी अधिकारी सी.जे.पाडवी यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त बोदवड तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी पुरवठा तपासणी अधिकारी एम.एफ.तडवी होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलन करून झाली.
यावेळी ग्राहक म्हणून गणेश पाटील, वराड यांनीही मनोगतात ग्राहक दिन नुसता केवळ फोटो सेशनपुरता साजरा करू नये. ग्रामपंचायतमध्येही ग्राहक दिन ग्राहक पंधरवडा साजरा केला पाहिजे, असे मत व्यक्त केले. वीज महावितरणच्या सौ.जाधव यांनी महावितरणबाबत तक्रार कुठे करायची. तसेच वेळेत वीज बिल भरल्यास होणारे फायदे याबाबत महावितरणच्या विविध तसेच ऑनलाईन सुविधाबाबत माहिती दिली. यावेळी बोदवड व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष गोपाल अग्रवाल, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष संजय अग्रवाल, ज्येष्ठ पत्रकार महेंद्र पाटील, ग्राहक कल्याण फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष गोपीचंद सुरवाडे आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला दिव्यांग प्रदेश संघटनेचे अध्यक्ष धनराज गायकवाड, पत्रकार अर्जुन असणे, जयराज पवार, गणेश पाटील, स्वस्त धान्य दुकानदार संघटना, त्यांचे प्रतिनिधी, तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी एस.आर. नेरकर, गोदाम व्यवस्थापक उपस्थित होते. कार्यक्रमात ग्राहकांचे हक्क व कर्तव्य याबाबत अधिक माहिती देण्यात आली. ग्राहक दिनाच्या थीमबाबतही माहिती देण्यात आली.प्रास्ताविक, सूत्रसंचालन तथा आभार महसूल सहाय्यक पुरवठा शाखेचे भागवत गायकवाड यांनी मानले.