साईमत, भुसावळ : प्रतिनिधी
कोंबड्यांच्या झुंजी लावून त्यावर सट्टा, पत्ता खेळणाऱ्या ११ जुगाऱ्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन हजार रुपयांच्या दोन फायटर कोंबड्यांसह पाच लाख ८६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार भुसावळ तालुक्यात कुऱ्हा गावी एका शेताच्या बाजूला सार्वजनिक जागी झुडपाजवळ १५ ते १६ जण कोंबड्यांच्या झुंज लावून त्यावर पैशांचा हार-जीतचा खेळ खेळताना दिसून आले. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये दोन हजार रुपये किमतीचे फायटर कोंबडे, तीन हजार ६०० रुपये रोख, मोबाईल फोन आणि १४ दुचाकी असे मिळून पाच लाख ८६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी संशयित आरोपी शहीद शेख सादिक (वय २३), शेख जावेद शेख (वय ३८), आशिष राजेश सोनी (वय २१), नेल्सन लेनिन पेट्रो (वय ४३), शेख आरिफ शेख युसुफ (वय ३१), मोहसीन शेख (वय ३२), सलमान शेख सलीम (वय २६), रशीद सय्यद निसार (वय ४२), अर्जुन बादल गरड (वय २४), शेख इमाम शेख (वय ३८) आणि इतर पाच ते सहा जण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक बबन जगताप, स.पो.नि. विशाल पाटील, विठ्ठल फुसे, पो.हे.कॉ. सुरज पाटील, संकेत झांबरे आदींनी केली आहे.