साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी.पी.आर्टस, एस.एम.ए. सायन्स अँड के. के.सी. कॉमर्स कॉलेज आणि के. आर. कोतकर ज्युनिअर कॉलेज येथे मराठी विभागात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.के. एस. खापर्डे, विद्यार्थी उपस्थित होते.
मराठी भाषेची जडणघडण, विकास व प्रचार, प्रसार यासंदर्भाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना आपण मराठी भाषिक म्हणून मराठी भाषेची अस्मिता जपली पाहिजे, असे आवाहन डॉ. एम. व्ही. बिल्दीकर यांनी केले.
प्रास्ताविकात मराठी विभाग प्रमुख डॉ. आर.एन. चंदनशिव यांनी मराठी भाषा, मराठी भाषेचे थोरपण आणि कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यशस्वीतेसाठी प्रा. वैशाली पाटील, शिक्षकेतर कर्मचारी रघुनाथ खलाल यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन डॉ. वीरा राठोड यांनी मानले.