साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
दिव्यांगांसह गरजू रुग्णांसाठी शासन विविध योजना राबवित आहे. शासन, जिल्हा प्रशासन दिव्यांगांसाठी तसेच रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत. त्यांना कोणतीही मदत हवी असल्यास, काही अडचण असल्यास ती तात्काळ दूर करण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारच्या शिबिराच्या माध्यमातून आरोग्य व दिव्यांग बांधवांना त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करून जीवन सुसह्य होण्यास मदत होईल. राजकारण विरहित केलेल्या आरोग्यसेवेमुळे आत्मिक समाधान प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
पं.स.चे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, मुकुंदराव गोसावी आणि जी.पी.एस मित्र परिवाराने आरोग्य व दिव्यांगाच्या सेवेसाठी राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक करून लवकरच दिव्यांगांना आवश्यक साहित्याचे वाटप केले जाईल. मोतीबिंदू असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची अद्ययावत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे, माजी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंदराव गोसावी, जीपीएस परिवार व ना. गुलाबराव पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शिबिरात ५३ दिव्यांग बांधवांना युडीआयडी प्रमाणपत्राचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
शिबिरात सुमारे ३०० दिव्यांग व्यक्तींची दिव्यांग प्रमाणपत्रासाठी तपासणी केली. १०० व्यक्तींची दिव्यांग साहित्यासाठी नोंदणी केली आहे. शिबिरात २६९ ज्येष्ठ नागरिकांच्या केलेल्या तपासणीत १४३ व्यक्तींची मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड केली आहे. लवकरच त्यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हील हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदूंचे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी शेकडो नागरिकांनी आरोग्य तपासणीही केली. प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन पं.स.चे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे तर माजी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी आभार मानले.
यांची होती उपस्थिती
यावेळी दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे एस.पी. गणेशकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, अनिल पाटील, सचिन पवार, डॉ. कमलाकर पाटील, उपजिल्हाप्रमुख पी.एम. पाटील, मार्केट कमिटीचे प्रमोद पाटील, ग्रामविकास अधिकारी पाठक, डॉ. सचिन अहिरे, डॉ. विजय कुरकुरे, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. नितीन विसपुते, डॉ. स्वप्नील कळसकर, डॉ.कांचन नारखेडे, शेखर वैद्य, राहुल बऱ्हाटे, श्वेता पाटील, चेतन निकम यांच्यासह दिव्यांग बांधव, ग्रामस्थ उपस्थित होते.