साईमत जळगाव प्रतिनिधी
येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल मध्ये श्री. छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव शहरातील प्रसिद्ध अस्थिरोग शल्यचिकित्सक डॉ. हर्षवर्धन जावळे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मूर्तीला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप प्राचार्य दिपक भावसार यांनी केले.
याप्रसंगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्याचा विविध अंगांचा उलगडा करत भुषण पाटील, किर्ती वाघ या विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्रजी भाषेत भाषणे सादर केली. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व ‘अफजलखानाचा वध’ या प्रसंगावर आधारित पोवाडा सादर केला. इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत नृत्य – नाटिका सादर करून शिवजन्म ते शिवराज्याभिषेक असा संपूर्ण शिवचरित्रावर प्रकाश टाकला.
यानंतर शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन यांनी अध्यक्षीय समारोपाचे भाषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावासमोर विविध बिरुदे वापरून घोषणा देत सुरु केले. त्यांनी आपल्या भाषणादरम्यान रयतेच्या राजाचे आपल्या सेनेवर असलेल्या अतूट विश्वासाचे उदाहरण येसाजी कंक या प्रसंगातून दिले. तसेच मावळ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवर असणारा दुर्दम्य विश्वास आणि समर्पणाची भावना कशी होती यावर हिरोजी इंदुलकर यांचे उदाहरण दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात सर्वधर्मसमभाव आणि समता या तत्त्वांचा अवलंब केल्याचे राज्यकारभारात दिसून येते असे प्रतिपादन केले.
सूत्रसंचालन जिज्ञासा कुमत, देवांगी बारी, नील सराफ या विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रदर्शन सुम्बुल खान पठाण या विद्यार्थिनीने केले.
यशस्वीतेसाठी शाळेतील उपप्राचार्य दिपक भावसार, वरिष्ठ प्रशासन अधिकारी जितेंद्र कापडे, पोदार प्रेप च्या मुख्याध्यापिका उमा वाघ ,वरिष्ठ समन्वयक हिरालाल गोराणे, कार्यक्रम समन्वयीका अंकिता मुंदडा आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.