साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामधून स्वयंसेवकांचा व्यक्तिमत्व विकास होतो. आपण समाजाचा एक अविभाज्य घटक असून समाजाचे देणे लागतो. त्यासाठी रासेयोच्या प्रत्येक स्वयंसेवकाने समाजाची सेवा करण्याचे तत्त्व अंगीकारावे, असे प्रतिपादन खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे यांनी केले. जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तसेच अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने विशेष हिवाळी शिबिराचा चिमणपुरी पिंपळे येथे नुकताच समारोप करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. डॉ. ए. बी.जैन होते. सात दिवसाच्या शिबिराचा १२५ स्वयंसेवकांनी लाभ घेतला.
शिबिरात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ.जैन यांनी विविध कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले. शिबिरात स्वयंसेवकांनी मतदार जनजागृती, प्लास्टिक मुक्त गाव, दंत चिकित्सा शिबिर तसेच गावाची स्वच्छता करण्यात आली. स्वयंसेवकांनी गावात प्रभातफेरी काढून बालविवाह प्रतिबंध, युवा पोर्टल नोंदणी तसेच गावातील नागरिकांना ईव्हीएम मशीनबाबत माहिती दिली. तसेच पथनाट्य सादर करून ग्रामस्थांची मने जिंकून घेतली.
चिमणपुरी पिंपळेच्या सरपंच वर्षा युवराज पाटील यांनी स्वतःचे राहते घर विद्यार्थिनींना निवासासाठी उपलब्ध करून दिले. शिबिरासाठी दत्त मंदिर प्रतिष्ठानचे अध्यक्ष निंबा दला चौधरी यांनी कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध करून दिले. शिबिरासाठी रासेयोचे संचालक प्रा. डॉ. सचिन नांद्रे, विभागीय समन्वयक प्रा. डॉ.दिलीप गिऱ्हे, जिल्हा समन्वयक डॉ. दिनेश पाटील, अधिसभा सदस्य डॉ. संदीप नेरकर यांनी भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवून मार्गदर्शन केले.
शिबिरासाठी सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष बापू चौधरी, लोटन रूपचंद भील, गोकुळ चुडामण पाटील, राजू देवचंद पाटील, कल्पना साहेबराव पाटील, मिना सतीश पाटील, निंबा दयाराम चौधरी, गोविंदा काशिनाथ चौधरी, अरुण संभाजी पाटील, जयवंतराव पाटील, ग्रामसेवक किरण लंके तसेच ग्रामस्थांनी सहकार्य केले. रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. हेमंत पवार यांनी अहवाल वाचन केले. समारोपाचे सूत्रसंचालन तथा आभार महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. भाग्यश्री जाधव यांनी मानले.