साईमत, पाळधी, ता. धरणगाव : वार्ताहर
येथील रेल्वे सल्लागार समितीने अमळनेर रेल्वे स्टेशन येथे पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर अशोककुमार मिश्रा आणि मुंबई सेंट्रलचे मॅनेजर यांना नीरज वर्मा यांना पाळधी रेल्वे स्टेशनला काही गाड्या थांबण्याबाबत निवेदन देवून सकारात्मक चर्चा केली. निवेदन देतेवेळी संदेश झंवर, प्रदीप जैन, महेंद्र चौधरी, योगेश पाटील, अधिकार पाटील, कैलास पाटील, मनोहर लंके आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, पाळधी स्टेशन परिसरात पस्तीस ते चाळीस खेडे लागून आहेत. या गावातील जनता रेल्वे प्रवास मोठ्या प्रमाणात करतात. अमरावती, शेगाव, मुंबई, सुरत, उधना, येथील प्रवासी आहे. कारण कामानिमित्त पाळधी परिसरातील जनता मुंबई, सुरत रोजगारासाठी गेली आहेत. अनेक वर्षापासून सुरत पॅसेंजर व मेमो या दोन गाड्या व्यतिरिक्त कुठल्याही रेल्वेला थांबा नाही. पाळधी रेल्वे स्टेशन येथून अनेक जलद गाड्या धावतात. परंतु कुठल्याही जलद गाडी पाळधी स्टेशन येथे थांबत नाही. जलद गाडीत बसण्यासाठी जळगाव येथून बसावे किंवा उतरावे लागते.
जळगाववरून पाळधीसाठी रात्री रिक्षा किंवा बसची व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. यावर सकारात्मक विचार करून पाळधी स्टेशन परिसरातील प्रवाश्यांना होणारा त्रास कमी करावा. निवेदनात भुसावळ ते बांद्रा गाडी नंबर १९००४ खान्देश एक्सप्रेस व अमरावती ते सुरत २०९६ रेल्वे गाड्या येणाऱ्या आणि जाणाऱ्यांना थांबा मिळावा, असे पाळधी व परिसराच्यावतीने रेल्वे सल्लागार समितीने रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली आहे.