साईमत, भुसावळ : प्रतिनिधी
आयुष्यात खूप अडचणी येतील. संकटे येतील. त्यांना पाहून थांबू नका. पुन्हा कामाला लागा. संकटे पुन्हा पुन्हा येत असतील तर वेळेवर मार्ग बदलावा लागला तरी चालेल पण चालत रहा. सतत आपली अध्ययन करण्याची भूक सुरु ठेवा. थांबू नका, असे प्रतिपादन श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष सोनु मांडे यांनी केले. येथील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलीत अहिल्यादेवी कन्या विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा ज्ञानज्योत आदान-प्रदान व शुभेच्छा प्रधान कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी शाळेतील विद्यार्थिनी कादंबरी चौधरी, ललिता चौधरी, अक्षता देवडा, जयश्री सोनार यांनी शाळेविषयी भावना व्यक्त केल्या. तसेच शाळेतील शिक्षक प्रकाश चौधरी, मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी यांनीही परीक्षाबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर दहावीच्या विद्यार्थिनीकडून शाळेला भेटवस्तू देण्यात आली. ज्ञानज्योत आदान प्रदान इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा देऊन प्रदान करण्यात आली.
यावेळी संस्थेचे संचालक श्रीधर खनके, मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी, पर्यवेक्षक संजीव पाटील उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय काशिनाथ बारेला यांनी करुन दिला. सूत्रसंचालन आशिष निरखे, वंदना ठोके तर आभार प्रशांत देवरे यांनी मानले.