साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र ऊर्फ बाळू मोरे यांच्यावर गेल्या ७ फेब्रुवारी रोजी काही अज्ञातांनी गोळीबार करुन त्यांचा खून केला होता. त्यानंतर गोळीबार करणारे आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चाळीसगाव उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेवून त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना देऊन मार्गदर्शन केले होते. त्यानंतर अखेर याप्रकरणी पथकाने लोणीकंद परिसर पिंजून काढून दोन जणांना ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले. दोघा आरोपींना चाळीसगाव शहर पो.स्टे.ला पुढील तपास कामी ताब्यात देण्यात आले आहे.
सविस्तर असे की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना ११ फेब्रुवारी २०२४ रोजी याप्रकरणी दोन आरोपींविरुध्द गोपनिय माहिती मिळाली होती. त्यावरुन त्यांनी सचिन सोमनाथ गायकवाड (वय २३, रा. घाटरोड, चाळीसगाव) आणि अनिस ऊर्फ नव्वा शेख शरिफ शेख (वय २३, रा. हुडको, चाळीसगाव) हे अहमदनगर आणि पुणे येथे गेल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार स.फौ. विजयसिंग धनसिंग पाटील, पो.हे.कॉ. सुधाकर रामदास अंभोरे, लक्ष्मण अरुण पाटील, पो.ना.राहुल जितेंद्रसिंग पाटील यांना तात्काळ अहमदनगर आणि पुणे येथे रवाना केले. त्याप्रमाणे पथकातील पोलीस अंमलदार यांनी आरोपीतांचा अहमदनगर आणि पुणे येथे गोपनिय माहितीच्या आधारे शोध घेत होते.
यादरम्यान त्यांना माहिती मिळाली की, आरोपी हे लोणीकंद परिसर, पुणे येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी आरोपीतांचा शोध घेण्यासाठी लोणीकंद परिसर पिंजून काढला. त्यानंतर पथकाने दोघांना शिताफीने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पो.हे.कॉ. अक्रम शेख याकुब, महेश महाजन, प्रमोद लाडवंजारी, शिवदास नाईक, पो.ना. हेमंत पाटील, किशोर मोरे, पो.कॉ.ईश्वर पंडीत पाटील यांनी केली.