साईमत जळगाव प्रतिनिधी
ज्येष्ठ नागरिकांनी शारीरिक अडचणी सोबतच आपले मनस्वास्थ्य ही चांगले ठेवावे, खुल्या मनाने जगावे असे सांगत आपल्या मतदानाचा हक्क नक्की बजावा असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. ते इंडियन रेडक्रॉस सोसायटी आयोजित जेष्ठ नागरिक श्रेष्ठ नागरिक मेळाव्या प्रसंगी बोलत होते.
इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव तर्फे कांताई सभागृहात एक दिवसीय ज्येष्ठ नागरिक श्रेष्ठ नागरिक स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळावा ५०० जेष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेडक्रॉस सीनियर सिटीजन व समुपदेशन समितीचे चेअरमन धनंजय जकातदार यांनी केले. उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी ज्येष्ठ नागरिकांनी शारीरिक अडचणी सोबतच आपले मनस्वास्थ्य ही चांगले ठेवावे, खुल्या मनाने जगावे आणि आपल्या मतदानाचा हक्क नक्की बजावा असे आवाहन त्यांनी केले. भुसावळ येथील प्रांताधिकारी अर्पित चव्हाण (भा.प्र.से.) यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारे कायदे व त्याचा वापर कसा करावा याबद्दल माहिती दिली. समुपदेशक विणा महाजन , डॉ. जयंत जहागीरदार , दिगंबर महाजन, पुणे येथील डॉ.कविता कुलकर्णी – दातार , डॉ. संभाजी देसाई , निळकंठ गायकवाड आदींनी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी रतनलाल सी.बाफना फाउंडेशन ट्रस्टचे संचालक सिद्धार्थ बाफना यांनी जेष्ठ नागरिकांना भावी आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. रेडक्रॉस रक्तकेंद्राचे चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी यांनी रक्तदान आणि NAT तंत्रज्ञान याविषयी थोडक्यात माहिती दिली.
रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी रेडकॉसमार्फत भविष्यात घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघांचा व पदाधिकाऱ्यांचा रेडक्रॉस मार्फत सन्मान करण्यात आला. उपस्थित सर्व जेष्ठ नागरिकांना रेडक्रॉस मार्फत आरोग्य कीट भेट देण्यात आले. आभार प्रदर्शन चेअरमन विनोद बियाणी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा यांनी केले.
दिवसभराच्या या सत्रासाठी रेडकॉस आपत्ती व्यवस्थापन समिती चेअरमन सुभाष सांखला, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे नोडल ऑफिसर घनश्याम महाजन, कार्यकारीणी सदस्या डॉ.अपर्णा मकासरे, शांताबाई वाणी, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण तिवारी, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी डॉ.राजेश सुरळकर व कर्मचारी उपस्थित होते.