जामनेरात दिव्यांगांना स्वयंचलित सायकलींचे वाटप

0
18

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

येथील पंचायत समितीत तालुक्यातील दिव्यांग बांधवांना माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते स्वयंचलित सायकलींचे वाटप नुकतेच करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग योजनेअंतर्गत तालुक्यातील तब्बल १७ दिव्यांग बांधवांना स्वयंचलित सायकलींचे मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, सेवानिवृत्त अभियंता जे.के.चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजमल भागवत, पंचायत समितीचे माजी सभापती नवलसिंग राजपूत, विस्तार अधिकारी अशोक पालवे, अमर पाटील, पवन माळी यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी तसेच दिव्यांग बांधव, नागरिक उपस्थित होते.

केंद्र सरकारने देशातील सर्व अपंगांना ‘अपंग’ असे न संबोधता ‘दिव्यांग’ असे संबोधण्यात यावे. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी स्वताःचा उद्योग व्यवसाय सुरू करावा. यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत स्वयंचलित सायकलींचे वाटप करण्यात येते. समाजातील शेवटच्या वंचित दुर्लक्षित असलेल्या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व वंचित दुर्लक्षित घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविणे हाच संकल्प असल्याचे मनोगत पंचायत समितीचे माजी सभापती नवलसिंग राजपूत यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील कोणताही लाभार्थी शासनाच्या योजनेपासून वंचित राहू नये. यासाठी त्यांना योग्य असे मार्गदर्शन केले जाईल. कोणाचीही आर्थिक लुबाडणूक होऊ नये, त्याची खबरदारी घेण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती राजमल भागवत यांनी केले. ‘सबका साथ सबका विकास’ या उद्देशाने संपूर्ण देशात दिव्यांग बांधवांना स्वयंचलित सायकलींचे वितरण करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here