साईमत, बोदवड : प्रतिनिधी
तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय विकलांग पार्टीच्यावतीने तहसील कार्यालयावर मंगळवारी रोजी सकाळी १२ वाजता मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार अनिल वाणी उपस्थित नसल्याने हे निवेदन पुरवठा निरीक्षक एम.एफ.तडवी यांनी स्वीकारले. दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या पाच टक्के राखीव निधीच्या अर्जाचे वितरणही करण्यात आले.
शासकीय निकर्षानुसार चाळीस टक्क्यावर दिव्यांग असलेल्या बांधवांना कोणत्याही अटी शर्ती विना सरळ अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत, नगरपंचायत क्षेत्रात दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेला पाच टक्के निधी त्वरित त्यांना मिळावा, त्याचप्रमाणे राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी ग्रामपंचायत स्तरावर शासनाने वेगळ्या निधीची तरतूद करावी अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले. यावेळी दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष धनराज गायकवाड, तालुकाध्यक्ष प्रवीण वंजारी, शहराध्यक्ष श्याम लुंढ, संपर्कप्रमुख भगवान सूर्यवंशी यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते.