साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
समता सैनिक दलाच्या कोअर, राष्ट्रीय आणि महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची प्रथम त्रैमासिक बैठक ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे रविवारी, ४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी पार पडली. बैठकीला सर्व राष्ट्रीय कोअर कमिटी, राष्ट्रीय आणि राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष अशोक खनाडे होते. बैठकीत कोअर कमिटीचे अध्यक्ष अशोक टेंभरे, समन्वयक धम्मा कांबळे, राष्ट्रीय महासचिव प्रा.गुलाबराव राजे, बौद्धिक प्रमुख रमेश जाधव, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजाभाऊ कदम, राज्याध्यक्ष धर्मभूषण बागुल यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर मत व्यक्त करुन मार्गदर्शन केले.
बैठकीच्या विषय पत्रिकेनुसार बैठकीचे कामकाज सुरू करण्यात आले. त्यात विविध विषयांवर उपस्थित सर्वांनी सविस्तर चर्चा करून एकमताने निर्णय घेतले. देशासमोरील ज्वलंत प्रश्न, आजची स्थिती, त्यावर पर्याय याबाबत लोकशाही पद्धतीने सर्वाची मते जाणून घेण्यात आली. त्यांचे संकलन करण्यात आले. सामाजिक विषयावर बैठकीत गंभीरपणे चर्चा करण्यात आली. अपेक्षित, कमजोर व मागासलेल्या समाजाच्या तसेच बेरोजगारी, महागाई यासारख्या जिव्हाळ्याच्या व ज्वलंत प्रश्नांवर आणि त्यांच्या पर्यायांवर चर्चा करण्यात आली. संघटनात्मक व्यवस्थापन, आर्थिक नियोजन व नियोजित कार्यक्रम आणि त्यांचे नियोजन आदी विषयांवर सखोल व गांभीर्यपूर्वक चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
चाळीसगावला राज्य कार्यालय असणार
राष्ट्रीय कार्यालय नागपूर येथे असेल. राज्य कार्यालय मुंबई येथे सुरू करण्यात येईल. तोपर्यंत चाळीसगाव येथील कार्यालय राज्य कार्यालय असेल. झेंडा, लोगो, लेटरपॅड यावर एकमताने निर्णय घेण्यात आला. त्याचा नमुना लवकरच प्रकाशित केला जाईल. बैठकीत ध्वजगीत गाऊन दाखविण्यात आले. त्यास मान्यता देण्यात आली. आणखी प्रेरणा गीत निर्माण झाल्यास त्यास स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार राष्ट्रीय कार्यकारिणीस असेल, असे ठरविण्यात आले. स्थापना दिवस, गणवेश आणि प्रतिज्ञा यावर संशोधन करून योग्य निर्णय घेण्यासाठी कोअर कमिटीचे अध्यक्ष अशोक टेंभरे यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यीय समिती निर्माण केली आहे.
समितीच्या अध्यक्षपदी अशोक टेंभरे
समितीने ४ मार्च २०२४ पर्यंत योग्य निर्णय घ्यायचा आहे. तसेच दलाची संरचना, व्यवस्थापन, कामकाज पद्धत, नियमावली, शिष्टाचार याबाबतचा मसुदा तीन महिन्यात तयार करून सादर करण्याचे ठरले आहे. समितीचा निर्णय अंतिम निर्णय असेल आणि तो सर्वांना बंधनकारक असणार आहे. समितीच्या अध्यक्षपदी अशोक टेंभरे तर सदस्यांत रमेश जाधव, राजाभाऊ कदम, ॲड.अभय लोखंडे, प्रा.गुलाब राजे, धम्मा कांबळे आणि धर्मभूषण बागुल यांचा समावेश आहे. दिवसभर चाललेल्या बैठकीत अपेक्षेप्रमाणे अनेक विषयांवर चर्चा करून अनेक निर्णय घेण्यात आले. पुढील बैठक कधी आणि कुठे होईल त्याचा निर्णय लवकरच कळविला जाईल. सुत्रसंचलन राज्य महासचिव शशिकांत थूल यांनी केले.