साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर
येथील नगरपालिकेच्या हद्दीतील मोठ्या आखाड्याजवळील सुन्नी मुस्लिम कब्रस्तानाच्या मध्यभागी असणाऱ्या एका वडाच्या झाडाखाली लाल रंगाचा कुंकु, ८ ते १० हिरवे लिंबू, गुळ, मसूर डाळ, उडीद, गहू, ३ ते ४ लहान हाडांचे तुकडे, फुल, एक लाल रंगाचा कपडा आणि पिशवी असे साहित्य आढळून आले. त्याठिकाणी साहित्य काहीतरी जादूटोण्याच्या उद्देशाने कुणीतरी टाकल्यामुळे याबाबतची चर्चा समजली. त्यामुळे जादुटोण्याचा प्रकार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होऊ लागली आहे.
महिला अन्याय अत्याचार विरोधी समितीचे रावेर तालुका उपाध्यक्ष युसूफ शाह आणि शहराध्यक्ष फरीद शेख यांच्यासह मलक समद, शेख कलिम जनाब, शेख आबीद, शेख मोईन, शेख इरफान, गुलाम ग्रिस, जावेद दरवान यांनी १ फेब्रुवारी रोजी दुपारी ३-३० वाजेच्या सुमारास घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याबाबतची माहिती सावदा पोलीस स्टेशनचे एपीआय जालिंदर पळे यांना भ्रमणध्वनीद्वारे दिली. तेव्हा त्यांनी तात्काळ पो. कॉ.मोहसीन पठाण यांना घटनास्थळी पाठविले. त्यानंतर गैरप्रकाराची लेखी तक्रार सावदा पोलीस ठाण्यात देण्यात आली.
तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, भविष्यात कब्रस्तानात अशा घटना होऊ नये, म्हणून स्थानिक पालिका प्रशासनाने कब्रस्तानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत पोलीस प्रशासनाने योग्य तो पत्रव्यवहार करून ही समस्या मार्गी लावावी, अशी प्रमुख मागणी केली आहे.