साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरामुळे सक्षम युवा घडतो. शिबिरामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे श्रमसंस्कार शिबिर म्हणजेच सक्षम युवा घडविणारे ठरत असल्याचे प्रतिपादन शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांनी केले. शिबिरामुळे मुलींनी कशी प्रगती करावी, याबद्दल त्यांनी त्यांच्या आयुष्यातील प्रसंग सांगितले. जीवन जगतांना त्याचा कसा फायदा झाला, याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. शिबिरासाठी मुलींची संख्या पाहून त्यांनी महाविद्यालयासह कार्यक्रम अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित बी. पी. आर्ट्स, एस. एम . ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स व के. आर. कोतकर महाविद्यालय चाळीसगाव राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराचा प्रारंभ वरखेड(बु) येथील अण्णासाहेब उदेसिंग पवार सर्वोदय आश्रमशाळेत नुकताच उत्साहात झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी चा. ए. सो. चे अध्यक्ष आर. सी. पाटील होते. शिबिराचे उद्घाटन प्रतिभा चव्हाण आणि स्वातंत्र्य सैनिक कुटुंबातील सदस्य ज्योतीसिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरखेड आश्रमशाळा स्कुल कमिटीचे चेअरमन इंद्रसिंग पवार, वरखेडचे सरपंच प्रतिनिधी कोमलसिंग कच्छवा, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक शेख, कार्यक्रमाचे निमंत्रक, महाविद्यालयाचे उपप्राचार्य, चा. ए. सोसायटीचे शिक्षक प्रतिनिधी, संचालक प्रा. डॉ.अजय काटे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. आर. आर. बोरसे, प्रा. आर. एस. पाटील, प्रा. दीपक पाटील, प्रा. पंकज वाघमारे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दीपाली बन्सवाल, प्रा. वैशाली पाटील उपस्थित होते.
शिबिराचे उद्घाटन सानेगुरुजी यांच्या ‘खरा तो एकची धर्म’ प्रार्थनेने करण्यात आले. प्रास्ताविकातून प्रा. बोरसे यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला आणि विद्यार्थ्यांना संपूर्ण सात दिवसाच्या शिबिराचे नियोजन सांगितले. निमंत्रक काटे यांनी त्यांच्या मनोगतामधून विद्यार्थ्यांना शिबिरासाठी मार्गदर्शन केले. शिबिरासाठी मुलींची संख्या जास्त असल्यामुळे त्यांनी सर्व मुलींच्या पालकांचे आभार मानले.
अध्यक्षीय समारोप आर. सी. पाटील यांनी केला. राष्ट्रीय सेवा योजना शिबिर जीवन जगण्यासाठी आवश्यक संस्कार आणि मूल्य देते आणि व्यक्तीचा विकास घडवून आणत असल्याचे मत त्यांनी मांडले. वरखेडचे सरपंच प्रतिनिधी कोमलसिंग कच्छवा यांनी गावाकडून सर्वेतोपरी मदतीचे आश्वासन दिले. इंद्रसिंग पवार आणि आश्रमशाळेचे मुख्याध्यापक शेख यांनी सर्व शिबिरार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शाळेकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. शिबिरात १४० शिबिरार्थी मुले-मुली उपस्थित होते.
चा.ए.सो.चे मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायण अग्रवाल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. दुपारच्या सत्रात उपप्राचार्य प्रा.वसईकर यांनी पर्यावरण संवर्धन आणि डॉ.राहुल कुलकर्णी यांनी आधुनिक काळातील रोजगाराच्या नवीन संधी यावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. आर. एस. पाटील तर आभार प्रा. दीपक पाटील यांनी मानले.