साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर
जामनेर तालुक्यातील नांद्रा प्र.लो.येथील श्री गजानन महाराज मंदिराला शुक्रवारी, २६ जानेवारी रोजी एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सप्ताहाचे आयोजन केले होते. यानिमित्त २० ते २७ जानेवारी २०२४ पर्यंत आत्मारामानंद महाराज वृंदावन यांची भागवत कथा महाराजांच्या मधुर वाणीतून ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भक्तांनी श्रवण केली. तसेच सात दिवस किर्तन, भजन, हरिपाठाचा आनंद घेतला. ह. भ. प. अविनाश महाराज चौधरी, नाचणखेडा, ह.भ.प. मुकुंद महाराज, नांद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नियोजन मोलाचे ठरले. तसेच अविनाश महाराजांनी आजच्या युवा पिढीने एकत्र येऊन धार्मिक व सामाजिक कार्य करावे. गावात वेगळे असलेले मित्र मंडळ एकच मित्र मंडळ करावे, असे आव्हान केले.
महाप्रसादचे अन्नदान श्री धनराज केशव पाटील यांच्यातर्फे करण्यात आले. पवित्र भागवत ग्रंथाची पालखीमध्ये गावात प्रदक्षिणा दिंडी काढण्यात आली. गावातील तरुण-तरुणी, वृद्ध, माता-भगिनी यांनी उत्साहात आनंद घेतला. सात दिवस कार्यक्रमासाठी नाचणखेडा, रोटवद, भिलखेडा सार्वे, जोगलखेडा, सवतखेडा, कासमपुरा यांच्यासह इतर गावातील भजनी मंडळ ग्रामस्थांची उपस्थिती लाभली. सर्वांचे गजानन महाराज भक्त परिवार, नांद्रा यांनी सन्मान करून आभार मानले. सर्व समाज बांधवांनी आणि विशेष करून तरुणांनी एकत्र येऊन सामाजिक, शालेय, राजकीय आणि धार्मिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आत्मारामानंद महाराज यांनी केले.