साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य कलश यात्रा काढण्यात आली. यात्रेत कलश घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. तसेच ही भव्य मिरवणूक मुक्ताईनगर येथील जुनेगावातील हनुमान मंदिर येथून शहरातील प्रवर्तन चौकात समाप्त होऊन त्यानंतर मुक्ताईनगर येथील १५ कार सेवकांचा आ.चंद्रकांत पाटील यांनी शाल, पुष्पगुच्छ व प्रभू श्रीरामाची प्रतिमा देऊन सत्कार केला. त्यानंतर आ.चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच ह.भ.प. जळकेकर महाराज यांनी मार्गदर्शन केले. यानिमित्त शहरात आनंदाचे वातावरण होते. घरोघरी रांगोळी, फुलांची सजावट, दिवे लावले होते. चौकात भव्य असे सुशोभित स्टेज तयार केले होते. यानंतर श्रीराम यांची आरती करून कार्यक्रमाची सांगता झाली. तसेच शहरातील मंदिरात रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई केली होती. शहरातील प्रत्येक प्रभागात ठिकठिकाणी श्रीराम यांचे पूजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कारसेवक, शहरातील नागरिक, शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी व महिला उपस्थित होते.
शहरातील १७ प्रभागामध्ये ठिकठिकाणी सजावट करून श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच काही ठिकाणी भंडारा व महाप्रसादाचे आयोजन केले होते. मुक्ताईनगर प्रभाग क्र.१७ मध्ये श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्यानिमित्त श्री अयोध्या नगर फलकाचे अनावरण आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील मंदिरात रंगरंगोटी करून रांगोळी व फुलांनी सजावट करून दिवे लावून विद्युत रोषणाई केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोहळा जल्लोषात साजरा
मुक्ताईनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्सवाचे आयोजन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या ठिकाणी सकाळी ११ वाजता सत्यनारायणाची महापूजा कारसेवक राजू कपले यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण शहरातील मंदिरात तसेच कार्यालयासमोर मोतीचुरच्या लाडूचे वाटप करण्यात आले. शहरातील कारसेवकांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील आ.एकनाथराव खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते, माजी सरपंच प्रवीण पाटील, शहराध्यक्ष राजू माळी, बाळा भालशंकर, निलेश पाटील, बबलू सापधरे, संजू कोळी, अजय तळेले, ॲड.राहुल पाटील, बापू ससाणे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच आ.एकनाथराव खडसे यांच्यावतीने संपूर्ण मतदार संघात श्रीरामाचे मोठमोठे कटआउट, ‘मी कारसेवक असल्याचा अभिमान आहे’ असे भव्य मोठमोठे बॅनर संपूर्ण मतदार संघात लावण्यात आले होते. मुक्ताईनगर शहरातील सकल मराठा समाज मंगल कार्यालय येथे भव्य पंचवीस हजार दिवे लावून रामज्योत प्रज्ज्वलन करून ‘जय श्रीराम’ असेे नाव तयार केले होते.