एणगाव हायस्कुलमध्ये ३१ जानेवारीपर्यंत विद्यार्थीच ‘मास्तर’

0
12

साईमत, बोदवड : प्रतिनिधी

तालुक्यातील एणगाव हायस्कुलमध्ये हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शालेय शिक्षण प्रशासन चालविण्यास सुरुवात केली आहे. २३ ते ३१ जानेवारी दरम्यान होणाऱ्या सर्वेक्षणासाठी एणगाव हायस्कुलमधील मुख्याध्यापक वगळता सर्व शिक्षक या कामासाठी नियुक्त केले आहेत. परिणामी, ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षणाचा बोजवारा उडू शकतो. संभाव्य परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांचे अध्ययनाचे कार्य सुरळीतपणे सुरू रहावे, यासाठी मुख्याध्यापक डॉ. पुरुषोत्तम गड्डम यांनी शिक्षक दिनी अध्यापन केलेल्या विद्यार्थी शिक्षकांना सोबत घेऊन शाळा नियमित सुरू केली आहे. त्यामुळे ३१ जानेवारीपर्यंत विद्यार्थीच ‘मास्तर’ म्हणून ज्ञानार्जन करणार आहे.

एणगाव हायस्कुलमध्ये अनेक विद्यार्थी वरखेड बुद्रुक, वरखेड खुर्द, राजुर, निमखेड आणि घाणखेड या गावामधून येत असल्याने त्यांच्या जाण्या-येण्याच्या वेळा सुकर व्हाव्यात म्हणून, सर्वेक्षणा दरम्यानच्या कालावधीत म्हणजे ३१ जानेवारीपर्यंत शाळेच्या वेळेत अंशतः बदल केलेला आहे. सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळामध्ये त्यांनी शाळा नियमित सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात ग्रुप एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन एन. डी. बोंडे तथा सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली एणगाव हायस्कुलच्या वेळेत बदल केलेला आहे. विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव अतिशय रंजक आणि जबाबदारीचा असल्याचे मत, विद्यार्थी शिक्षकांनी यादरम्यान व्यक्त केले.

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी महसूल विभागाने मोहीम हाती घेतली आहे. याकामी घरोघरी जाऊन तपासणीचे काम शिक्षकांवर लादण्यात आले आहे. याबाबत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. हे सर्वेक्षण कसे वेळात व्हावे, यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. मागासवर्ग आयोगाने तयार केलेली प्रश्‍नावली मोबाईल ॲपद्वारे तयार केली आहे. ती प्रश्‍नावली लक्षित लाभार्थी यांना विचारण्यात येणार आहे. त्याद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. मागासवर्गीय आयोगाच्या सूचनांनुसार सर्वेक्षण केले जाणार आहे. हे काम किचकट तसेच क्लिष्ट असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. पण अशाही परिस्थितीत शाळा नियमित चालावी, यासाठी एणगाव हायस्कुलच्या संचालक मंडळ तथा मुख्याध्यापकांनी हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. उपक्रमाबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here