भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या ३६ धावपटूंचा टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये यशस्वी सहभाग

0
78

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी

तरुणाईचा सळसळता उत्साह, ज्येष्ठ नागरिकांची जिद्द आणि दिव्यांगांची प्रेरणादायी धाव मुंबईच्या रस्त्यांवर रविवारी उमटली. जगभरात प्रतिष्ठेची मानली जाणारी आणि धावपळीच्या जीवनात मुंबईकरांना सुदृढ आरोग्याचा मार्ग दाखविणारी ‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२४’ ही स्पर्धा रविवारी आयोजित केली होती. ‘हर दिल मुंबई’चा नारा देत हजारो मुंबईकर आणि जगभरातील तब्बल ५७ हजाराहून अधिक धावपटू यात सहभागी झाले होते. त्यात भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या ३६ धावपटूंनी यशस्वी सहभाग नोंदविला. आपल्या असोसिएशनसह भुसावळ शहराचे नाव अभिमानाने उंचावले.

ही स्पर्धा ४२ कि.मी.ची पूर्ण मॅरेथॉन, २१ कि.मी.ची अर्ध मॅरेथॉन, महिलांकरिता १० कि.मी.चा रन आणि ६ कि.मी.चा ड्रीम रन या ४ श्रेणींमध्ये घेण्यात आली. अर्ध मॅरेथॉन वगळता इतर तीनही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकासमोरून सुरु झाल्या. अर्ध मॅरेथॉन माहीमच्या रेती बंदर मैदानातून ५ वाजता सुरु झाली. यावेळी स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, राज्याचे विविध खात्यांचे मंत्री व पोलीस, प्रशासन व महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी ध्वनीक्षेपकावर गाणीही वाजविण्यात आली. तसेच मुंबई पोलीस बॅण्डनेही सादरीकरण केले. त्याशिवाय असंख्य मुंबईकर भल्या पहाटेपासून धावपटूंसाठी केळी, पेयजल, विविध फळे, चॉकलेट्स आदी खाद्यपदार्थांची व्यवस्था करून टाळ्या वाजवून व विविध प्रकारचे फलक हातात घेऊन धावपटूंचे कौतुक करीत होते. असंख्य मुंबईकरांच्या प्रेमामुळेच की काय प्रत्येक धावपटू आपले नैतिक कर्तव्य समजून अविरत धावत होता व आपले लक्ष्य गाठत होता. ‘ड्रीम रन’ या गटात विविध सामाजिक संस्था, व्यावसायिक संस्था व नागरिकांनी सामाजिक संदेश देणारे फलक हाती घेत आणि वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा परिधान करीत सर्वाचेच लक्ष वेधून घेतले. मुंबई मॅरेथॉनचे यंदा १९ वे वर्ष होते.

रनचे वैशिष्ट्य म्हणजे कित्येक महिला धावपटू चक्क हातमागावर विणलेल्या साड्या नेसून धावल्या. त्याशिवाय ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘जय श्रीराम’, ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘जय भवानी जय शिवाजी’ आदी घोषणा देत अनेक धावपटू एकत्र धावत होते. इतरांना प्रेरित करीत होते. हा संपूर्ण उत्साह विदेशी धावपटू मोठ्या कुतूहलाने बघत धावत होते. अतिशय रोमांचक वातावरणात पहाटेचा काळोख भेदत व थंडीला हुलकावणी देत भुसावळचे धावपटू आपल्या तिरंगी रंगाच्या अधिकृत टी शर्ट परिधान करून धावत असतांना मूळचे जळगाव जिल्ह्यातील व आता मुंबईत नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले नागरिक व सोबतचे धावपटू भुसावळच्या धावपटूंची आस्थेवाईकपणे चौकशी करीत होते. लहान शहरातून इतके धावपटू आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त करीत होते.

भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे सहभागी धावपटू असे :

४२ कि.मी. (१४ धावपटू) : उमेश घुले, विजय फिरके, तरुण बीरिया, मोहन देशपांडे, युवराज सूर्यवंशी, जितेंद्र चौधरी, विलास पाटील, संतोष मोटवानी, सुरेश सहानी, प्रदीप सोळंकी, संदीपकुमार वर्मा, प्रवीण वारके, गणसिंग पाटील, डॉ.तुषार पाटील.
२१ कि.मी. (१५ धावपटू) : डॉ.चारुलता पाटील, डॉ.स्वाती फालक, डॉ.वर्षा वाडिले, एकता भगत, दीपा स्वामी, माया पवार, प्रियंका मंत्री, महेंद्र पाटील, रमेशसिंग पाटील, सारंग चौधरी, सुधाकर सनान्से, प्रकाश आटवानी, सचिन मानवानी, जय मनवानी, प्रवीण पाटील
१० कि.मी. (२ धावपटू) : माधुरी चौधरी, किर्ती मोताळकर
६ कि.मी. (५ धावपटू) : पूनम भंगाळे, वैशाली मानकरे, नितीन पाटील, संजय मोताळकर, भालचंद्र मानकरे
याशिवाय प्रवीण फालक, राजेंद्र ठाकूर (४२ कि.मी.), डॉ.नीलिमा नेहेते, ममता ठाकूर (२१ कि.मी.) व मंजू शुक्ला (६ कि.मी.) हे धावपटू आपल्या व्यक्तिगत अडचणींमुळे स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here