
साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर
तीन राज्यांना जोडणारा एकमेव बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नियमित अपघातांमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे हाडे ‘खिळखिळी’ झाली आहे. सध्या हा महामार्ग पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे कुठलेच वाहन व्यवस्थितपणे चालविता येत नाही. जागोजागी फूटभर खड्डे पडलेले आहे. त्यामुळे वाहन चालवावे तरी कसे? असा प्रश्न महामार्गावरील प्रत्येक वाहनधारकांना पडत आहे. दुसरीकडे याच महामार्गावर नियमितपणे वाहतूक शाखेकडून वसुली होत असल्याने वाहनधारक चांगलेच कचाट्यात सापडल्याचे दिसत आहे. त्यामुळे पूर्ण महामार्गाचे उच्च प्रतीचे डांबरीकरण व्हावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
सविस्तर असे की, गुजरात-महाराष्ट्र-मध्यप्रदेश या तीन राज्यांना जोडणारा बऱ्हाणपूर-अंकलेश्वर हा एकमेव महामार्ग आहे. हा मार्ग कधी महामार्ग बनेल याबाबत अजुनही सांशकता आहे. मार्गाची कोण? कधी? कुठे? मोजमाप करते हेही अद्यापही समजत नाही. त्याच भागातील लोकप्रतिनिधी ह्या महामार्गावरुन नियमितपणे ये-जा करतात. पण त्यांनाही ह्या यातना समजत नसल्याचे चर्चिले जात आहे. मार्गाची देखभाल व दुरुस्ती हे ‘न्हाई’कडे असल्याचे समजते. पण त्यांच्याकडून फक्त ठिकठिकाणी थिगळ जोडण्याचे काम ठराविक ठिकाणी होत असते. काहीवेळा तर चक्क पावसाळ्यातही ‘न्हाई’चे अधिकारी उभे राहुन मातीमिश्रीत वाळूच्या सहाय्याने मार्गाला मलम लावण्याचे काम करतांना दिसले. याबाबत स्थानिक प्रतिनिधींनीही काहीसा आवाज उठविला. त्याचा काही फायदा अधिकाऱ्यांवर झाला नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून या मार्गावर ठिकठिकाणी खडी टाकण्यात आलेली आहे. पण अद्यापही कुठेच काम सुरु नसल्याने खडीही हळुवारपणे कमी होत जातांना दिसत आहे.
महामार्ग चांगला बनविण्यासाठी सर्वच स्तरांवरुन आंदोलन
हा महामार्ग प्रचंड खराब झालेला आहे. तो दुरुस्त व्हावा, यासाठी गेल्या २३ मे २०२३ रोजी आ.लता सोनवणे, महामंडलेश्वर जनार्दन महाराज व त्यांचे सहकारी, माजी सभापती डी.पी.साळुंखे, डोणगाव इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी, डॉ.चंद्रकांत बारेला, शेतकरी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी वेळोवेळी आंदोलन, निवेदन केले. पण त्याचा कुणावरही काहीच परिणाम झालेला नाही. चक्क आमदार यांनीही अडावद येथे शेकडो कार्यकर्ते घेऊन रस्त्यावर उतरुन आंदोलन करुनही काही फायदा झालेला नाही. एक इंचही रस्ता दुरुस्ती झालेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशी, ग्रामस्थ यांनी बोलुन काय होईल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाहतूक शाखेकडून वसुली नियमितपणे
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्ग प्रचंड खराब आहे. कुठलेच वाहन व्यवस्थितपणे चालत नाही. त्यातच जळगाव येथील वाहतूक शाखेकडून अडावद, धानोरा, किनगाव, यावल, रावेर या भागात नियमितपणे वाहनांची तपासणी करुन रक्कम वसुल केली जाते. त्यामुळे वाहनधारक खराब रस्त्याने हैराण आहेच. पण वसुलीमुळेही चांगलेच नाराज आहे.
जागोजागी फूटभर पडले खड्डे
महामार्ग प्रचंड खराब असल्याने या मार्गावरील सर्वच पूल दयनिय अवस्थेत आहे. दोन्हीकडील रेलिंग तुटलेले आहेतच. त्यातच काही अंतरा-अंतरावर फुटभर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहन थेट खड्ड्यात गेल्याने हाडे खिळखिळी होत आहेत. सोबत वाहनांचे नुकसान होते ते वेगळे. त्यामुळे आर्थिक नुकसानासोबत शारीरिक हानी होत असल्याने प्रत्येक जण जीव मुठीत धरुन वाहन चालवित असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.


