साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील शुभम अनिल आगोणे मुंबई पोलीस याचा मकर संक्रांतच्या पूर्व संध्येला खुन करण्यात आला होता. याप्रकरणातील आरोपींपैकी काही आरोपी अद्यापही फरार आहेत. त्यांच्या निषेधार्थ समाजबांधव व इतर समाज बांधवानी हजारोंच्या संख्येने मोर्चात महिला व पुरुषांनी सहभाग घेतला. सोमवारी, २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता अहिल्यादेवी होळकर चौक, पाटणादेवी नाका ते घाटरोड छत्रपती शिवाजी महाराज चौक सिग्नल पॉर्इंट येथे निदर्शने केली.
मोर्चात फरार आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, आरोपींची केस जलद न्यायालयात चालविण्यात यावी, केस चालविण्यासाठी सक्षम सरकारी वकील नेमण्यात यावा, आरोपी हे परंपरागत सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी, आरोपी हे परंपरागत समाजविघातक प्रवृत्तीचे असून सराईत गुन्हेगार आहेत. त्यांना खटल्यामध्ये फाशीची शिक्षा करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश होता.
मुंबई पोलीस स्व.शुभम अगोणे याला न्याय मिळण्यासाठी जन आक्रोश मोर्चात खा.उन्मेश पाटील, आ.मंगेश चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख, प्रमोद पाटील, कैलास सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, तहसीलदार प्रशांत पाटील, रमेश चव्हाण, दिलीप घोरपडे यांच्यासह इतर अधिकारी, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच समाज बांधवांसह इतर समाज बांधव, विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी चाळीसगाव शहर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.