मुक्ताईनगर महावितरण विभागात ठेकेदारांच्या इशाऱ्यावर ‘प्रभारी राज’

0
62

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

मुक्ताईनगर महावितरण विभागामध्ये बाह्यस्त्रोत कामगारांचे ठेकेदारासह अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ मागील चार महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा, यासाठी तालुक्यातील दोन आमदार व खासदार प्रयत्नशील आहेत. तसा शब्दही लोकप्रतिनिधींकडून कंत्राटी तंत्रज्ञांना वेळोवेळी देण्यात आलेला आहे. मुक्ताईनगर महावितरण विभागामध्ये बाह्यस्त्रोत कंत्राटी तंत्रज्ञांची होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीच्या निषेधार्थ कंत्राटी कर्मचाऱ्यांना वारंवार आंदोलने करावे लागत आहेत. कंत्राटी तंत्रज्ञांच्या उपोषणानंतर संभाजीनगर येथील ठेकेदाराने त्यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र दिले. परंतु मागील काही वर्षांपासून कार्यरत काही कंत्राटी तंत्रज्ञांना कामावरून कमी केले. संताप जनक म्हणजे म्हणजे कंत्राटी कामगारांचे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याचे वेतन थकीत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतील ठेकेदाराने ठेका बंद केला असल्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांना टक्केवारी न दिल्यामुळे कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुक्ताईनगर महावितरण विभागात ठेकेदारांच्या इशाऱ्यावर ‘प्रभारी राज’ आला आहे. त्यामुळे कंत्राटी तंत्रज्ञांच्या डोक्याला ताप सहन करावा लागत आहे.

दैनिक ‘साईमत’च्या प्रस्तुत प्रतिनिधीने कंत्राटी तंत्रज्ञानावरील होणाऱ्या अन्याच्या निषेधार्थ वृत्त प्रसिद्ध केल्याने अनिल महाजन अधीक्षक अभियंता यांनी तात्काळ आशा इलेक्ट्रिकल्स यांना कंत्राटी तंत्रज्ञांचे काम घेण्याचे आदेशित केले. परंतु कार्यकारी अभियंता व आशा इलेक्ट्रिकलचे ठेकेदार यांच्या झालेल्या गोपनीय बैठकीनंतर आशा इलेक्ट्रिकलच्या ठेकेदारानेही मी काम करण्यास इच्छुक नसल्याचे पत्र अधीक्षक अभियंता यांना दिले असल्याची चर्चा महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये आहे. आशा इलेक्ट्रिकल्स काम करण्यासाठी इच्छुक नसेल तर ठेकेदाराने निविदा प्रक्रियेमध्ये भाग का घेतला असा प्रश्‍न उपासमारीची वेळ आलेल्या कंत्राटी तंत्रज्ञांच्या कुटुंबियांकडून विचारला जात आहे. तालुक्यातील दोन आमदार व एक खासदार कंत्राटी तंत्रज्ञानवरील होणाऱ्या अन्याय दूर करण्यासाठी आग्रही असताना मुक्ताईनगर महावितरण प्रशासन आर्थिक लालसेपोटी त्यांच्या सूचनांना केराची टोपली दाखवत असल्यामुळे तालुक्यात तीव्र संतापाची लाट आहे.

कामगारांचे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याचे वेतन थकीत असतानाच जानेवारी महिन्यात महावितरण प्रशासनाच्या इशाऱ्यावर ठेकेदाराने काम बंद केल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे मुक्ताईनगर महावितरण विभागातील बाह्यस्त्रोत कंत्राटी तंत्रज्ञांची अधिकाऱ्यांकडून होणारी शारीरिक, मानसिक, आर्थिक लूट तात्काळ थांबवून नवीन ठेकेदाराला कोणत्याही राजकीय नेत्याच्या पायावर लोळण्याची अट न लावता तात्काळ नवीन इच्छुक ठेकेदाराला नियुक्त करण्यात येऊन बाह्यस्त्रोत कंत्राटी तंत्रज्ञांचे मागील दोन महिन्यापासूनचे थकीत वेतन तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी कंत्राटी तंत्रज्ञांच्या कुटुंबीयासह परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here