साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथे २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भव्य नाईट क्रिकेट स्पर्धांचे आयोजन ‘नमो चषक’-२०२४ अंतर्गत केले होते. स्पर्धेत चाळीसगाव तालुक्यातील जवळपास ७० हुन अधिक संघांनी आपला सहभाग नोंदविला होता. स्पर्धेच्या महाअंतिम सामन्याचे नाणेफेक प्रसंगी आ.संजय सावकारे, आ.किशोर पाटील, नाशिक पश्चिमच्या आ.सीमा हिरे, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार, उद्योजक मनोज बियाणी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी काही दिवसांपूर्वीच निधन झालेले क्रिकेटपटू स्व.शुभम आगोणे यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सात दिवस रात्र चाललेल्या स्पर्धेत अंतिम सामन्यांमध्ये चाळीसगाव पोलिसांच्या ‘रक्षक ११’ विरुद्ध नवतरुण युवा मित्रांची ‘शक्ती ११’ अश्या दोन संघांचा सामना झाला. त्यात अनुभवी असणाऱ्या ‘रक्षक ११’ ने चमकदार कामगिरी करत ‘नमो चषक’- २०२४ क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले तर ‘शक्ती ११’ ला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. ‘शक्ती ११’ ने स्पर्धेत केलेली कामगिरी कौतुकास्पद अशीच होती. तिसऱ्यास्थानी ‘सीटीकेअर ११’ तर चौथ्यास्थानी ‘शक्ती ग्रुप’ संघ राहिला.
लवकरच भव्य समारंभात विजयी संघांसह खेळांडुंना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरण केली जातील. स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट समालोचक खान्देशपुत्र गोकुळसिंग गिरासे यांनी संपूर्ण ७ दिवस हिंदी, मराठी, अहिराणी भाषेत समालोचन करून क्रीडाप्रेमींना खिळवून ठेवले होते. यशस्वीतेसाठी राबलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात क्रीडाप्रेमींचे, भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आ.मंगेश चव्हाण यांनी आभार मानले आहेत.
