साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
येथील महावितरण विभागातील भ्रष्टाचार व भोंगळ कारभाराच्या परिसरातील नागरिकांकडून वारंवार वरिष्ठांकडे तक्रारी केल्या जात आहेत. काही महिन्यांपूर्वी कार्यकारी अभियंता जरी बदललेले असले तरी महावितरणचा भोंगळ कारभार थांबण्याचे नाव घेत नाही. त्याचेच भयावह उदाहरण म्हणजे मुक्ताईनगर महावितरणच्या विभागीय कार्यालय शेजारी उभ्या असलेल्या ट्रान्सफार्मरवरील डिस्ट्रीब्यूशन बॉक्स काही महिन्यांपासून उघडा पडलेला आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतरही महावितरण विभाग बॉक्सला पेटी बंद करण्यासाठी इच्छुक नाही. विशेष खेदाची बाब म्हणजे कार्यकारी अभियंत्यांसह विभागीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या चकाचक वाहने याच ट्रान्सफार्मरच्या रस्त्यावर पार्क केली जातात.त्यामुळे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी हा जीवघेणा कारभार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. त्याच्यावर तक्रारीनंतरही कोणतीही कार्यवाही करायला तयार नसल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष आहे.
महावितरणचे काही व्यसनी अधिकारी गुटखा खात याचं रस्त्याच्या शेजारील ट्रान्सफार्मरवर थुंकत उभे असतात. परंतु डिस्ट्रीब्यूशन बॉक्सला पेटी बंद करण्यासाठी त्यांच्याकडून कोणतीही हालचाल होत नाही. विशेष म्हणजे डिस्ट्रीब्यूशन बॉक्सच्या दोन फुटांवर नगरपंचायतचा पाणी सोडण्याचा व्हॉल आहे. पावसाळ्यात अथवा रात्री-अपरात्रीच्या वेळेस पाणी सोडताना चुकून दुर्दैवाने नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा उघड्या डिस्ट्रीब्यूशन बॉक्सच्या उघड्या पेटीला धक्का लागल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ट्रान्सफार्मर हा रस्त्यापासून तीन ते चार फुटाच्या अंतरावर आहे. विद्यार्थ्यांची रस्त्यावरून सायकलीने अथवा पायी नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे चुकून एखाद्या चिमुरड्याचा सायकलचा बॅलन्स गेल्यास होत्याचे नव्हते झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे परिसरातील पाल्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नव्या चकाचक एअर कंडिशनर गाड्यांमध्ये ठेकेदारासह फिरणारे अधिकारी जनतेच्या जीवनमरणाशी असलेल्या तक्रारींची दखल घेणार का? असा प्रश्न शहरातील सुज्ञ नागरिकांकडून विचारला जात आहे.