साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
येथील रेल्वे स्टेशनवर गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी जीपीएस मित्र परिवाराने रेल्वेच्या ऑन ड्युटी ऑफिसरला निवेदन दिले आहे. यावेळी जीपीएस मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते.
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील रेल्वे स्टेशनवर भेट देण्यासाठी रेल्वेचे डीआरएम निरज वर्मा येणार होते. नेमकी त्याचीच संधी साधून येथील जीपीएस मित्र परिवाराने त्यांना खान्देश एक्स्प्रेस, सुरत भुसावळ फास्ट पॅसेंजर, अमरावती-सुरत या गाड्यांना येथे थांबा मिळावा, या मागणीसाठी निवेदन देण्याचे नियोजन केले होते. मात्र, ते न आल्याने हे निवेदन येथील ऑन ड्युटी ऑफिसर रामप्रसाद भौमिक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात पाळधी हे रेल्वे स्टेशन पश्चिम रेल्वेचे सुरतपासून शेवटचे तर भुसावळपासून पहिले स्टेशन आहे. या स्टेशनला लागून २५ ते ३० खेडी आहेत. गावाची लोकसंख्या ३५ हजाराच्या आसपास आहे. येथील प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जळगाव येथे ये-जा करावी लागते. त्याचा नाहक त्यांना भुर्दंड सोसावा लागतो. सर्व गाड्यांना येथे थांबा मिळावा, अशी मागणी केली आहे.