साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, विद्यार्थी कल्याण विभाग व श्रीमती जी. जी .खडसे महाविद्यालय, विद्यार्थी कल्याण विभाग व युवती सभा अंतर्गत ८ ते १३ जानेवारी २०२४ या कालावधीत झालेल्या कार्यशाळेच्या समारोप करण्यात आला.
जळगाव जिल्हा विद्यार्थी कल्याण विभागाचे समन्वयक प्रा. संजय पाटील यांनी युवतींना मार्गदर्शन कर सर्व अंगाने सक्षम होण्यासाठी प्रेरित केले. कारण कोणाच्या आयुष्यात कोणता प्रसंग येईल, हे सांगता येत नाही. यासाठी प्रत्येक युवतीने आपल्या पायावर उभे राहणे म्हणजे आत्मनिर्भर होण्यासाठी आरोग्य, शिक्षण, व्यवसाय या गोष्टीवर भर द्यावा, असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.पी. पाटील यांनी पुस्तक वाचण्यापेक्षा जीवनात माणसे वाचता आली पाहिजे. कारण, जीवन जगत असताना पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञान जास्त महत्त्वाचे असते. त्या दृष्टीने जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलावा. आज महिलांचे जीवन चार भिंतीमधील नसून आपलं कर्तृत्व प्रत्येक क्षेत्रात सिद्ध करण्यासाठी तिने सज्ज व्हायला पाहिजे. त्यासाठी तिने आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे, असे सांगितले.
याप्रसंगी कु. वरदा, सलोनी, शाहिस्ता, गायत्री या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करुन कार्यशाळेतून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले, असे भाव त्यांच्या बोलण्यातून निघाले. अशा कार्यशाळेचे आयोजन हे नेहमी व्हावे, असे मतही सर्वांनी व्यक्त केले. यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ. संजय साळवे, युवती सभेच्या समन्वयिका प्रा. डॉ. प्रतिभा ढाके तसेच युवती सभेच्या सदस्य प्रा. सविता जावळे, तांत्रिक सुविधांसाठी चंदन शिंमरे, सचिन धुंदले यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेला बहुसंख्य विद्यार्थिनींचा प्रतिसाद लाभला. अहवाल वाचन प्रा. डॉ.सुरेखा चाटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ. ताहिरा मीर तर आभार प्रा. डॉ.सीमा राणे यांनी मानले.