साईमत जळगाव प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा यासाठी प्रतिवर्षी रंगतरंग कार्यक्रम आयोजित केला जातो. या महानाट्यामध्ये वाघ नगर मधील विवेकानंद प्रतिष्ठानच्या इंग्लिश मीडियम स्कूल व सेमी इंग्लिश उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रसंग सादर केले. यामध्ये शिवरायांचे महिला विषयक धोरण,न्याय व्यवस्था, विशेष आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा या संकल्पनेवर आधारित प्रसंग व नृत्य कलाविष्कार सादर केले. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी स्वतः नृत्य, गायन ,वादन, निवेदन करत होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक श्रीराम पाटील उपस्थित होते. तर जळगाव जनता सहकारी बँकेचे संचालक अनिल राव, व्यावसायिक कुशल गांधी, माजी विद्यार्थी युवराज तारे, विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्षा शोभाताई पाटील, सचिव रत्नाकर गोरे ,सहकोषाध्यक्ष हेमाताई अमळकर , थॅलेसेमिया डॉ. सई नेमाडे, शालेय समिती प्रमुख वाघ नगर शाळा कविता दीक्षित, प्रशासन अधिकारी दिनेश ठाकरे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हेमराज पाटील , इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य ज्ञानेश्वर वाघ , समन्वयक वैशाली पाटील, संतोष चौधरी याप्रसंगी उपस्थित होते.
यामध्ये शिवरायांचे शेतीविषयक धोरण, पर्यावरणाची जाण,त्यासंबंधी आज्ञापत्र यांचे प्रत्यक्ष दर्शन प्रसंगांच्या स्वरूपात विद्यार्थ्यांनी सादर केले. तसेच गुप्त स्वरूपात बहिर्जी नाईक यांनी दिलेली बहादुरगडाची माहिती व लूट ,अष्टप्रधान प्रसंगाचे सादरीकरण करण्यात आले . तसेच गोंधळ, पर्यावरण, शेती यावर आधारित नृत्य सादर करण्यात आले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर राजपूत, भारती पाटील यांनी केले