साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
सोलर प्रकल्प पीडित शेतकरी महिला अंबीबाई गणेश राठोड यांच्या संशयास्पद खून प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपींच्या अटकेसाठी सुरू असलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशी लेखी पत्र देऊन उपोषण सोडण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यास लिंबू शरबत पाजून आमरण उपोषण सोडण्यात आले. याप्रसंगी गुन्ह्याचे तपास अधिकारी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पो.निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, शेतकरी बचाव कृती समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक ह.भ.प. काशिनाथ माऊली, बंजारा एकीकरण समितीचे अध्यक्ष देवेंद्र डी.नायक, शेतकरी बचाव समितीचे अध्यक्ष वकील भरत चव्हाण, सचिव भिमराव जाधव, शिवसैनिक अवी इंदल चव्हाण, नागरे बंधू, प्रवीण जाधव, प्रदीप राठोड यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
उपोषणकर्त्याची प्रकृती खराब होत असल्याची बाब लक्षात घेऊन उपोषणकर्त्यांच्या मागणीबाबत समाधानकारक लेखी पत्र देऊन उपोषण थांबवावे, यासाठी तहसीलदार आणि नायब तहसीलदार धनराळे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना फोन करून उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीबाबत कल्पना देऊन तोडगा काढण्यास सांगितले.
गुन्ह्याचा तपास करीत असलेले पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी उपोषणकर्त्यांची प्रकृती लक्षात घेऊन समाधानकारक लेखी पत्र देऊन उपोषण थांबविले. त्याबद्दल शेतकरी बचाव समितीने त्यांचे आभार व्यक्त केले. दिलेल्या लेखी पत्रानुसार योग्य तो तपास करून पीडितांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा उपोषणकर्त्यांनी पोलीस निरीक्षक श्री. जाधव यांच्याकडे व्यक्त केली.
