साईमत, बोदवड : प्रतिनिधी
शहरातील तहसील कार्यालयासमोर राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेला मुलींसह मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेत ४० मुली आणि १४० मुले अशा एकूण १८० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी बोदवडचे नगराध्यक्ष आनंद पाटील, व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, नगरसेवक राजेश नानवाणी यांच्या हस्ते हिरवी झेंंडी दाखवून मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाला आ.चंद्रकांत पाटील यांच्या सुविद्य पत्नी यामिनी पाटील, कन्या संजना पाटील, मुलगा हर्षराज पाटील, उद्योजक अनुप हजारी, अनिल गंगतीरे, निलेश माळी, हर्षल बडगुजर, संजय पाटील, निवृत्ती ढोले, शांताराम कोळी, अनंता वाघ, कलीम शेख, अजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्तिक अनिल कोल्हे या विद्यार्थ्याने मासाहेब जिजाऊंचा पोवाडा सादर केला. मान्यवरांच्या उपस्थितीत व हस्ते यशस्वी स्पर्धकांना रोख बक्षीस सहभाग प्रमाणपत्र, स्मृतीचिन्हाचे वाटप करण्यात आले.
मॅरेथॉनमध्ये मुलांमध्ये प्रथम सुनील रामदास बारेला जळगाव, द्वितीय मुकेश रमेश धनगर, तृतीय सचिन राठोड पळसखेडा, ता.बोदवड तर मुलींमध्ये प्रथम अश्विनी नामदेव काटोले शिरसोली, जळगाव, द्वितीय अनिता मनीष मारेला जळगाव, तृतीय ममता खोंदले चिंचखेडा, ता.मुक्ताईनगर तसेच सामान्य ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले. त्यात विपुल प्रवीण पाटील जनता हायस्कूल नेरी, द्वितीय रोहित रमेश तायडे, तृतीय गोविंदा गजानन घोडके बोदवड, उत्तेजनार्थ कल्याणी प्रमोद मराठे यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस म्हणून रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेला जिल्ह्यासह शेजारील मलकापूर, बुलढाणा, वालसावंगी, नंदुरबार, संभाजीनगर या ठिकाणच्या मुलांनी सहभाग घेतला होता. छत्रपती ग्रुप बोदवडद्वारे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यशस्वीतेसाठी शैलेश वराडे, गणेश मुलांडे, दीपक खराटे, गणेश सोनोने, राजेंद्र वराडे, गोपाल पाटील, पवन पाटील यांनी परिश्रम घेतले.