साईमत, यावल/फैजपूर : प्रतिनिधी
येथील पोलिसांनी गुटखा वाहतुकीवर आजवरची सर्वात मोठी कारवाई केली आहे. कारवाईत दोन आयशर भरून सुमारे ८३ लाखांचा गुटखा जप्त केल्याने गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून मुख्य म्होरक्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, फैजपूर परिसरात ठिकठिकाणी विकल्या जाणाऱ्या स्थानिक गुटखा तस्करांच्याही मुस्क्या पोलिसांनी आवळाव्या, अशी नागरिकांकडून मागणी पुढे येत आहे.
सविस्तर असे की, फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ यांना बऱ्हाणपूरकडून फैजपूरकडे गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांसह बुधवारी, १० रोजी पहाटे तीन वाजता सापळा रचला. आमोदा गावाजवळील हॉटेल कुंदनजवळ आयशर (क्रमांक एम. एच. १९ सी.वाय.९३६४ आणि एम.एच.१९ सी.एक्स.०२८२) आल्यानंतर त्यांची तपासणी केली. तेव्हा त्यात गुटखा असल्याने दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात आणण्यात आली. पंचांसमक्ष वाहनाचा पंचनामा केल्यानंतर वाहनातून राज्यात प्रतिबंधीत असलेली ८३ लाख सहा हजार ८०० रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला तर ३४ लाख रुपये किंमतीची दोन्ही वाहने मिळून एकूण एक कोटी १७ लाख सहा हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कारवाईत ज्ञानेश्वर सुखलाल चौधरी (वय ३३, कोडगाव, ता. चाळीसगाव, ह. मु. शास्त्रीनगर, चाळीसगाव), जयेश सुभाष चांदलकर (वय ३३, रामेश्वर कॉलनी, जळगाव), राकेश अशोक सोनार (वय २९, रामेश्वर कॉलनी, जळगाव) आणि मंगेश सुनील पाटील (वय ३१, रामनगर, एमआयडीसी, जळगाव) यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे दोन्ही आयशर वाहनामागे टाटा हॅरीअर ही गाडी पोलिसांवर लक्ष ठेवून असल्याने या गाडीतील चालक मंगेश पाटील यास ताब्यात घेवून त्यालाही सहआरोपी केले आहे तर हा गुटखा आपला असल्याचा दावा पाटील यांनी केल्याचे समजते. हवालदार विकास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक मैनूद्दीन सैय्यद, उपनिरीक्षक मोहन लोखंडे, हवालदार गोकुळ तायडे, हवालदार विकास सोनवणे, हवालदार उमेश चौधरी, सहाय्यक फौजदार देविदास सुरदास, चालक अरुण नमायते आदींच्या पथकाने केली.