साईमत, जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील नंदगाव येथील नवनिर्वाचित युवा ग्रामपंचायत सदस्याचा नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अनोखा संकल्प सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. येथील युवा सदस्य स्वप्निल सोनवणे यांनी वैयक्तिक खर्चातून गावातील महिला, माता भगिनींना प्रोत्साहन मिळावे, म्हणून राज्य सरकारच्या निर्णयाच्या धर्तीवर ‘नंदलक्ष्मी सुकन्या योजना’ आणि ‘माहेरची साडी’ अशा दोन आदर्शवत योजना सुरु केल्या आहेत. युवासेनेचे उपतालुका प्रमुख स्वप्नील सोनवणे हे नाविण्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी परिसरात सर्वश्रृत आहेत. आता आपले वडील तथा नंदगावचे माजी सरपंच शांताराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्निल यांनी आदर्शवत असा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे गावासह परिसरातून कौतुक होत आहे.
आपल्या गावातील लाडकी मुलगी लग्न करून सासरी जातांना माहेरची भेट म्हणून माहेरची साडी योजनेंतर्गत स्वप्निल सोनवणे यांच्याकडून स्वखर्चाने पैठणी साडी भेट देण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थी मुलगी आपल्या गावातील रहिवासी असली पाहिजे व लग्न होण्याच्या १० दिवसाआधी परिवाराने ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक अथवा श्री.सोनवणे यांच्याकडे लग्नपत्रिका देऊन लग्नाची माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच गावात मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी ‘नंदलक्ष्मी सुकन्या योजना’ या योजनेंतर्गत गावातील सुनबाईने कन्येला जन्म दिल्यास सदस्याकडून २ हजार १०० रुपये प्रोत्साहन पर रक्कम भेट दिली जाणार आहे. यासाठी ग्रा.पं. कडे कन्येच्या जन्माबाबतची माहिती परिवारामार्फत द्यावी लागणार आहे. सोनवणे यांनी सुरू केलेल्या सर्व योजना १ जानेवारी २०२४ पासून लागू होणार आहेत. एखाद्या ग्रामपंचायत सदस्याने स्वखर्चातून राबविण्यात येणारा जिल्ह्यातील कदाचित हा पहिलाच उपक्रम असणार आहे.
समाजात मुलींबाबत निर्माण झालेल्या नकारात्मक विचारसरणीत बदल आवश्यक
सध्याच्या जगात संपूर्ण समाजाचा महिला आणि मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची नितांत गरज आहे. या योजनेच्या माध्यमातून समाजात मुलींबाबत निर्माण झालेल्या नकारात्मक विचारसरणीत बदल होणार आहे. गावात भ्रूणहत्येसारख्या गुन्ह्यांनाही आळा बसणार आहे. हा उपक्रम तालुक्यासह जिल्हा व राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी राबवून आपल्या गावातील माता-भगिनींना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन स्वप्निल सोनवणे यांनी केले आहे.