साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
ऊस तोडणी दरात ३४ टक्के वाढ तर ठेकेदारांना कमिशन दरात एक टक्क्याने वाढ करण्यात येणार आहे. असा मोठा निर्णय शरद पवार आणि पंकजा मुंडे यांच्या लवादाने नुकताच घेतला आहे. ह्या निर्णयामुळे ऊसतोड मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे येथे साखर संकुलनाची सभा नुकतीच पार पडली. त्यात शरद पवार आणि पंकजा मुंडे यांनी घेतलेला निर्णय बैठकीत साखर संघाचे पदाधिकारी पी.आर.पाटील, नॅशनल फेडरेशनचे जयप्रकाश दांडेगावकर यांच्या संयुक्त बैठकीत सर्व चर्चा झाली. त्याच बैठकीत आ.सुरेश धस, जयवंत पाटील, हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवटे, ऊस तोड संघटनेचे सुखदेव सानप, प्रा. डॉ. डी एल. कराड, सुशीला मोराळे, श्री.रसाळ, विश्वजीत पाटील, कृष्णा तिडके, श्रीमंत जायभाये, मोरे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
नव्या झालेल्या दरवाढीत बैलगाडीसाठी प्रति टन २३७ रूपये असा आतापर्यंत मिळत होता तो आता ३१७ रुपये १९ पैसेप्रमाणे करण्यात आला. डोके सेंटरसाठी २७३ रुपये दर मिळत होता तो आता ३६६ रुपयाप्रमाणे मिळणार आहे. गाडी सेंटरसाठी यापूर्वी ३०४ रुपयाप्रमाणे मिळत होता तो आता ४०८-४१ पैसे प्रमाणे मिळणार आहे तर मुकादमाचे कमिशन १९ टक्के मिळत होते ते आता २० टक्के प्रमाणे मिळणार आहे. अशा पद्धतीने ऊसतोड मजुरांच्या व मुकादमाच्या कष्टकरी वर्गाच्या कष्टाच्या दरात वाढ झाल्याने संक्रांतीच्या मुहूर्तावर कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच ठेकेदारांच्या कमिशन दरातही वाढ झाल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. कष्टकरी वर्गाला न्याय मिळाल्याने शरद पवार आणि पंकजा मुंडे यांचे कष्टकरी वर्गाने आभार मानले आहेत.
ऊस तोडणी कामगार राज्य संघटनेचे संचालक विश्वजीत पाटील चाळीसगाव यांनी सांगितले की, कामगारांनी त्यांच्या भावना व्यक्त करतांना सांगितले की, आम्ही अहोरात्र करुन मुलाबाळांना आणि वयोवृध्द आई-वडिलांना सोडून ऊस तोडणीसाठी विविध कारखान्यावर राज्यात, पर राज्यात ऊस तोडणीसाठी पोटाची खळगी भरण्यासाठी जात असतो. परंतु त्यांची दखल आजपर्यंत घेतली गेली नव्हती. परंतु शरद पवार आणि पंकजा मुंडे यांनी आमच्या व्यथा विचारात घेतली. आम्हाला न्याय मिळवून दिला असल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले असल्याचे विश्वजीत पाटील यांनी सांगितले.
संक्रांतीच्या मुहूर्तावर मिळाली गोड बातमी
गेल्या सीझन सुरु झाल्यापासून कामगार वर्गामध्ये नाराजीचा सूर होता. तो आता शरद पवार आणि पंकजा मुंडे यांच्या लवादाने मोठा निर्णय घेतला. त्यास साखर संघ आणि फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी संमती दिल्याने गोड उसाची गोड बातमी संक्रांतीच्या मुहूर्तावर मिळाली आहे. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत असल्याचे विश्वजीत पाटील यांनी सांगितले.