साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीसाठी एक ईव्हीएम व्हीव्हीपॅट मोबाईल व्हॅन उपलब्ध करुन दिली आहे. तिचे उद्घाटन चाळीसगाव भागाचे उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले, चाळीसगावचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी निवडणूक नायब तहसीलदार डॉ.संदेश निकुंभ, वाघळीचे मंडळ अधिकारी प्रवीण महाजन, महसूल सहायक तुशांत अहिरे, टाकळी प्रचाचे तलाठी महेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
त्यानंतर पातोंडा येथील मतदान केंद्रांवर मतदार जनजागृतीसाठी मंडळ अधिकारी यांच्या पथकासोबत व्हॅन पाठविण्यात आली. तसेच ही व्हॅन आणि आणखी एक अतिरिक्त गाडी याद्वारे संपूर्ण चाळीसगाव तालुक्यात मतदार जनजागृती येत्या २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत करण्यात येणार आहे. यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून मतदान प्रक्रिया समजून घेऊन लोकशाहीवरील विश्वास दृढ करावा, असे आवाहन प्रमोद हिले यांनी केले आहे.
